Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेतील बंडानंतर दुसरा मोठा भूकंप झाला तो राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये. अजित पवारांनी पक्षात बंड पुकारत आपल्या गटाची स्वतंत्र मोट बांधून महायुतीमधील फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून राज्यात शरद पवार व अजित पवार यांच्या दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची वाटचाल सुरू झाली.
शरद पवारांनी अजित पवारांना त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या फलकावर छायाचित्र वापरण्यास मज्जाव केला. त्यानुसार अजित पवारांनी ही सूचना अखेरपर्यंत पाळली. दुर्दैवाने जानेवारीत अजित पवारांचे अपघाती निधन झाले, आणि त्यांचा पक्षही पोरका झाला. आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा हाती घेतली आहे.
मात्र, तरीही शरद पवारांचे गारुड असलेले अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत असून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवारांनी आपल्याला शरद पवार यांनी स्वतःच्या छायाचित्राचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
शरद पवारांनी मला परवानगी दिली आहे. त्यामुळे यापुढे अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे छायाचित्रही पक्षाच्या बॅनर, फलक आणि विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणार असल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात संजय पवार यांनी माध्यमांना माहिती दिली, ते म्हणाले मी स्वत:या विषयावर शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी त्यांचे छायाचित्र वापरण्याबाबत परवानगी द्यावी मिळावी, अशी विनंती मी पत्राद्वारे त्यांच्याकडे केली. या पत्रावर शरद पवार यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मान्यता देत स्वाक्षरी केल्याचा दावा संजय पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही याबाबत पत्र देणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं. त्यामुळे या विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र याव्यात, अशी अपेक्षाही संजय पवार यांनी व्यक्त केली.
कोण आहेत संजय पवार?
जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पवार हे सुरवातीपासूनच पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय. त्यांचे वडील स्व. मुरलीधर पवार व शरद पवारांचे वेगळे ऋणानुबंध व कौटुंबिक संबंध होते. संजय पवारही शरद पवारांना गुरुस्थानी मानतात. म्हणून, त्यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमांच्या फलकावर पवारांचे छायाचित्र वापरण्याबाबत परवानगी मागितली . संजय पवारांनी नुकतीच मुंबईत पवारांची भेट घेऊन त्यांना त्यासंबंधीचे पत्र दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.