Dhule Constituency News : धुळे लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांची प्रचार सभा गुरूवारी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांसह विविध नेते यावेळी उपस्थित होते. धुळे लोकसभा मतदारसंघाचे पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदान होणार आहे.
महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. बच्छाव यांच्या प्रचारासाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या विविध पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या प्रचारसभेला मोठा प्रतिसाद मिळाला. सटाणा येथे झालेल्या या सभेत सभा संपताना जोरदार वादळी वारे सुरू झाले. या वाऱ्यामुळे व्यासपीठावरील बॅनरखाली पडले. हे बॅनर पडले तेव्हा पवार यांची सभा नुकतीच संपली होती. पवार व्यासपीठावरून उत्तरत होते. बॅनर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे उपस्थितांची धावपळ उडाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या यासभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. जवळपास तासभर चाललेल्या या सभेत नेत्यांनी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवर टीका करीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र असताना राजकीय विषय आणि धर्म या भोवती पंतप्रधानांची भाषणे असतात. .
पंतप्रधान मोदी आणि भाजपकडे (BJP) यांच्याकडे आता नवीन मुद्दे राहिलेले नाहीत याची जाणीव होते. शेतकरी संकटात असताना त्यांना कसा धीर देणार? यावर त्यांचे मौन आहे. त्यामुळे निवडणुकीचा कल कोणत्या दिशेला आहे, याची जाणीव देखील यातून होत आहे. सटाणा येथे झालेल्या या सभेत उमेदवार डॉ. बच्छाव यांनी प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे बेपत्ता खासदार आहेत. जनतेला त्यांची भेट मिळत नाही. त्यांनी न केलेल्या कामांचा गाजावाजा केला असल्याने मतदार नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.