
Nilesh Lanke latest news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या वर्तनावरून चांगलेच नाराज झाले आहे.
उपअधीक्षक अमोल भारती यांच्या वर्तनाविषयी पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार करत खासदार लंकेंनी कारवाईची मागणी केली आहे. अमोल भारती यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी देखील मागणी खासदार लंकेंनी केल्याने अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी पोलिस ठाणे आणि शिर्डीमधील (Shirdi) पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या वर्तनाविरोधात गंभीर आरोप होत असून खासदार नीलेश लंके यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना लेखी तक्रार करत पोलिसांची जनतेवरील दहशत थांबविण्याची मागणी केली आहे.
कोल्हार गावातील उद्योजक कैलास पिलगर यांना लोणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांने अमानुष मारहाण करून त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील रोकड हिसकावल्याचा आरोप आहे. तक्रार केली तर परिणाम भागावे लागतील, अशा धमक्या पोलिसांकडून दिल्या जात असल्याकडे खासदार लंकेंनी (Nilesh Lanke) तक्रारीतून पोलिस महासंचालकांचे लक्ष वेधले आहे.
निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या जिल्हाध्यक्षा शीतल गोरे यांनी कोल्हार इथल्या प्रकरणाविरोधात फेसबुक लाइव्ह करून प्रश्न उपस्थित केला. याच रागातून उपअधीक्षक अमोल भारती यांनी गोरे यांना मारहाण, अश्लाघ्य भाषा व जीवघेण्या धमक्या दिल्या. तुला आणि तुझ्या मुलाला गाडीखाली चिरडून टाकीन, अमोल भारती जे बोलतो तेच करतो, अशी वारंवार धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. शीतल गोरे यांचा मोबाईल हिसकावून त्यातील पुरावे नष्ट केल्याचेही खासदार लंकेंनी लेखी तक्रारीत म्हटले आहे.
लोकशाही व्यवस्थेत पोलिस ही जनतेची सुरक्षा देणारी यंत्रणा आहे. मात्र शिर्डी विभागात नागरिकांवरच दहशत माजवली जात आहे. हा लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे. त्यांनी मागण्या केल्या आहेत की, या प्रकरणांतील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यात यावे, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांचे निलंब करून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी खासदार लंकेंनी केली आहे.
तसेच या घटनेतील सहभागी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, पोलिस दहशतीविरूध्द आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संरक्षण देण्यात यावे. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अस्वस्थता व भीती निर्माण करणारी असून यावर कडक, ठोस आणि पारदर्शक कारवाई होणे आवश्यक असल्याचे खासदार लंकेंनी तक्रारीत म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.