Nagar News: लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिर्डी मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना रंगू लागला आहे. ठाकरे आणि शिंदे शिवसेनेच्या शिलेदारांचा शिर्डी मतदारसंघात वावर वाढला आहे. यामुळे राजकारण तापू लागले आहे. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिर्डी मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency 2024) माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी बैठकांचा जोर वाढवला आहे.
शिर्डी लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक नुकतीच झाली. बैठकीत मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या बूथ कमिटींचा आढावा घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीत कोणताही गाफीलपणा खपवून घेतला जाणार नाही. ही संधी वारंवार मिळणार नाही. त्यामुळे निवडणुकीला सन्मानाने सामोरे जा. सभांच्या नियोजनावर या बैठकीत चर्चा झाली.
महाविकास आघाडीच्या विधानसभा मतदारसंघनिहाय सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तारखा आणि वेळा यांची सांगड घातली आहे. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी श्रीरामपूर शहरातील उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा धावता आढावा घेतला. माजी नगरसेवक शेखर दुबैया यांची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांचीदेखील भेट घेतली.
सुनील शिंदे यांनी बैठका आणि धावत्या गाठीभेटी घेत असतानाच दादा भुसे, सचिन चौधरी शिर्डी मतदारसंघात दाखल झाले. अशोक कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भेट घेतली. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे या वेळीदेखील उपस्थित होते. दादा भुसे यांनी संचालकांशी भेट घेत चर्चा केली. यानंतर भानुदास मुरकुटे आणि दादा भुसे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.चर्चेचा सविस्तर तपशील समजला नाही. परंतु भुसे यांनी मुरकुटे यांना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचे निवडणुकीत काम करावे, अशी गळ घातली आहे.
या चर्चेबाबत भानुदास मुरकुटे यांनी काहीसा तपशील सांगत, निवडणुकीत मदत करण्याची विनंती भुसे यांनी केली आहे, असे सांगितले. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही मुरकुटे यांनी सांगितले.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.