Mahayuti seat sharing: विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १३ आमदार सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत. त्यामुळे इथे जागावाटप कसे होते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
महायुतीचे जागावाटप येत्या एक दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र निश्चित करताना भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल, असे बोलले जाते.
हे राजकीय चित्र नाशिक जिल्ह्यात पात्र अतिशय विपरीत आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे केवळ दोन आमदार आहेत. त्यामुळे या दोन जागा वगळता अन्य जागांमध्ये महायुती शिवसेना शिंदे गटाला वाटेकरी करणे जवळपास अशक्य आहे.
सध्याचे चित्र पाहता महायुतीच्या जागा वाटपात भारतीय जनता पक्षाकडे पाच विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहा विद्यमान आमदार आहेत. विद्यमान आमदारांच्या जागा अन्य पक्षाला सोडण्याचे उदाहरण कुठेही घडलेले नाही.
अशा स्थितीत काँग्रेसकडे असलेली इगतपुरी आणि एमआयएम कडे असलेली मालेगाव शहराची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडली तरीही हा पक्ष विधानसभा निवडणुकीत फारसा परफॉर्मन्स दाखवेल अशी स्थिती नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे
शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या चांदवड, नाशिक मध्य आणि इगतपुरीसह अन्य काही मतदारसंघांमध्ये आपला दावा केला आहे. शिंदे गटाने दावा केला तरीही आपल्या आमदारांच्या जागा भाजप शिंदे गटाला देण्याची शक्यता नाही.
राज्यात मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला नाशिक जिल्ह्यात मात्र पंधरापैकी अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागणार आहे. महाविकास आघाडीत मात्र याच्या विपरीत स्थिती आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आक्रमक पद्धतीने निवडणुकीची तयारी आणि जागा वाटपाचे सूत्र सांगण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या काही मतदारसंघांमध्ये देखील दावा केला आहे. याशिवाय ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गट गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होता ते मतदारसंघ शिवसेना आपल्याकडे ठेवणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट अधिक आक्रमक पद्धतीने जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होत आहे.
शिवसेना ठाकरे गटाने सध्या नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, निफाड, येवला, दिंडोरी, नांदगाव, देवळाली, सिन्नर या मतदारसंघांवर दावा केला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला गेल्या निवडणुकीत मिळालेले मतदान आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार हे निकष खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
या स्थितीत आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट महायुतीच्या उमेदवारांना आक्रमकपणे आव्हान देण्याच्या स्थितीत आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचा मात्र अवघ्या दोन जागांवर संकोच होणार आहे..
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.