Shivsena UBT: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उपनेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता बडगुजर पुढचा निर्णय काय घेतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
आपली भूमिका मांडण्याची संधी न देताच हकालपट्टी झाल्याने बडगुजर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षाच्या काही निर्णयांबाबत आपण नाराज होतो. तशी भावनाही जाहीरपणे व्यक्त केली होती. पण पक्षातील कामकाजाबाबत नाराजी असल्यानेच तसे म्हणालो होतो. पक्षप्रमुखांनी त्याची शिक्षा हकालपट्टी करून दिली आहे.
मात्र वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय मी मान्य करतो. पक्षात आपली भूमिका मांडण्याची संधी मिळायला पाहिजे होती, अशी खंत बडगुजर यांनी व्यक्त केली. शिवाय नुकतीच बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी आपण नाराज असल्याचे सांगितले होते. यावरही बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिले.
शिवसेनेच्या महानगरपालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही भेट पूर्वनियोजित होती. राजकारणाशी संबंध जोडणे योग्य नाही. वरिष्ठांना त्याची कल्पना देखील दिली होती, असेही बडगुजर यांनी स्पष्ट केले.
सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्या पराभवानंतर बडगुजर हे पक्ष सोडणार अशी चर्चा शहरात होती. मात्र त्यांनी पक्ष सोडला नव्हता. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने मध्यंतरी त्यांना उपनेतेपदावर प्रमोशन देण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच जिल्हाप्रमुख म्हणून माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबत बडगुजर नाराज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले होते. गेल्या दोन दिवसांपासून बडगुजर हे पक्षांतर करणार अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने स्वतःच सावधगिरी बाळगत बडगुजर यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.
बडगुजर यांच्या हकालपट्टीचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी बडगुजर यांचे काही मोजके समर्थक त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. त्यांच्या घोषणा क्षीण होत्या. मात्र आम्ही सर्व प्रभागातील मतदार बडगुजर यांच्यासोबत असल्याची ग्वाही या कार्यकर्त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.