

इगतपुरी नगरपरिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय इंदुलकर यांच्याकडे सत्ता होती.
दोन दिवसांपूर्वी अचानक इंदुलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
निवडणुकीच्या तोंडावर हा घडलेला पलटी गेम उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Shivsena UBT News : इगतपुरी नगरपालिका आणि संजय इंदुलकर हे राजकीय समीकरण आहे. गेले 30 वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंदुलकर यांची शहरात एक हाती सत्ता होती. ही सत्ता आता दोलायमान झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप अनेक राजकीय प्रयोग करीत आहेत. तिकडे असलेली सत्ता आणि साधनांची जादूची कांडी त्यात निर्णय भूमिका बजावत आहे. त्याचा मोठा प्रयोग शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर झाला.
इगतपुरी नगरपालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संजय इंदुलकर यांच्याकडे एक हाती सत्ता होती. शिवसेनेने त्यांना भरभरून साथ दिली. मात्र दोन दिवसांपूर्वी जादूची कांडी फिरावी तशी एका रात्रीत इंदुलकर भाजप पक्षात गेले. संजय इंदुलकर यांचा भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आणि विविध नेत्यांनी इगतपुरीत धाव घेतली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये इंदुलकर यांच्या निर्णयाने प्रचंड रोष होता. आता इंदुलकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीची जमवा जमव सुरू झाली आहे.
इंदुलकर यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा विश्वास होता. आजही पक्ष त्यांच्यावर विश्वास ठेवतो. त्यांनी भाजप प्रवेश का केला याचा फेरविचार करावा? इंदुलकर यांचा निर्णय कार्यकर्ते आणि जनतेचा विश्वासघात करणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तातडीने सक्रिय झाला असून आज खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यानिमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे पक्ष निवडणुकीत पॅनल उतरवणार आहे.
या राजकीय घडामोडींचा मोठा परिणाम इगतपुरीच्या राजकारणावर होणार आहे. महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने येथे जोरदार तयारी केली आहे. शालिनी खातळे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून त्यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष त्यांच्या सोबतीला आहे.
आमदार हिरामण खोसकर आणि माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी माजी नगराध्यक्ष इंदूरकर यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. तीस वर्ष सत्तेत राहिल्याने अँटी इन्कमबन्सी इंदुलकर यांच्या विरोधात होती. त्यावर राजकीय उपाय म्हणून त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
मात्र त्याचा कितपत उपयोग होईल, याविषयी स्वतः इंदुलकर यांचे समर्थकच गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भाजपचा एका रात्रीतून इंदुलकर यांना आपल्या गोठात ओढण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.
1. संजय इंदुलकर कोण आहेत?
ते इगतपुरी नगरपरिषदेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि प्रभावशाली नगरसेवक आहेत.
2. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
संजय इंदुलकर यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
3. ही घटना केव्हा घडली?
ही घटना दोन दिवसांपूर्वी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडली आहे.
4. शिवसेनेच्या उद्धव गटावर याचा काय परिणाम झाला?
इगतपुरीतील सत्ता उद्धव गटाकडून भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
5. इंदुलकर यांच्या प्रवेशामागे काय कारण सांगितले जात आहे?
भाजपकडून सत्तेची साधनं आणि राजकीय पाठबळ मिळेल या कारणास्तव त्यांनी पक्षांतरण केल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.