

Shrirampur arson case : सामाजिक कामातून एका व्यक्तीला मदत केल्याचा राग मनात धरून एका युवकाने सरपंच पतीच्या कार ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूरमधील जाफराबाद इथं घडली.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गावातील गेल्या चार महिन्यात वाहन पेटवून देण्याची ही दुसरी घटना आहे. या दोन्ही घटनेतील आरोपी एकच असल्याने गाव ढवळून निघालं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील (Shrirampur) जाफ्राबाद-खैरी निमगाव रोड परिसरातील शेतगट क्रमांक 105 येथे शुक्रवारी (ता. 10) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी संदीप भाऊसाहेब शेलार (वय 49, रा. जाफराबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सामाजिक कामाच्या निमित्ताने अनिल दशरथ नांगळ यांना मदत केली होती.
याच कारणावरून आरोपी शुभम बाबासाहेब नांगळ (रा. नागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर) याने संतापातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. आरोपीने फिर्यादीची सुमारे तीन लाख रुपये किमतीची कार लक्ष्य करत, त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली.
या प्रकारात कारचे मोठं नुकसान झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आरोपीचा माग काढणं पोलिसांना (Police) सोपं झालं.
पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार पी. डी. आगलावे तपास करत आहेत. दरम्यान, केवळ वैयक्तिक आकसातून थेट कार पेटविण्याचा प्रकार घडल्याने श्रीरामपूर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
डिसेंबर 2025मध्ये अनिल दशरथ नांगळ यांच्या मालकीचा नवाकोरा ट्रॅक्टर याच आरोपीने पेटवून दिला होता. या घटनेप्रकरणी अनिल नांगळ यांनी फिर्याद दाखल केली होती. मात्र, त्या वेळी आरोपीवर ठोस कारवाई झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, कारवाईचा अभाव असल्याने आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला आणि त्यानंतर त्याचा परिसरातील वावर अधिकच वाढल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा कार जाळण्याची घटना घडल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.