Nashik Politics : सिन्नर तालुका हा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. येथील नगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे व राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे क्रीडामंत्री माणिकराव कोकोटे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोघांशिवाय भाजप व शिवसेना शिंदे गटानेही येथे आपआपले उमेदवार दिल्याने सिन्नरमध्ये चौरंगी लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटेंनी राजाभाऊ वाजे यांना साथ दिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटेंना साथ दिल्याचा आरोप भाजप नेते उदय सांगळे यांनी वाजे यांच्यावर केला आहे. उदय सांगळे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून कोकाटेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. राजाभाऊ वाजे यांनी गद्दारी केल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप भाजप प्रवेशावेळी उदय सांगळेंनी केला होता. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आता नगरपालिका निवडणुकीतही वाजे-कोकाटेंचे ठरले आहे अशा चर्चा सध्या सिन्नरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
त्यावर कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलं. कोकाटे म्हणाले, सिन्नरमध्ये वाजे आणि आमचे ठरले आहे अशा वावड्या उठवल्या आहे. एकत्र यायचेच असते तर उघडपणाने एकत्र आलो असतो. वास्तविक आम्हा दोघांनाही मालक कोणीच नाही. मी मंत्री आहे. माझा उमेदवार बसवून मी दुसऱ्या उमेदवाराला का निवडून आणेल याचाही विचार गैरसमज पसरवणाऱ्यांनी करावा. मी उमेदवार पाडण्यासाठी नाही तर निवडून आणण्यासाठी उभे केले आहेत. खा. वाजे त्यांचा पक्ष सांभाळत आहेत आणि मी माझा पक्ष वाढवत आहे असे कोकाटे यांनी स्पष्ट केलं.
राजाभाऊ वाजे यांनी (शिवसेना ठाकरे पक्षाकडून) प्रमोद चोथवे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तर माणिकराव कोकाटे यांनी (राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून)विठ्ठल उगले यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार दिलेला असतानाही कोकाटे हे फारसे सक्रीय नसल्याने सिन्नरमध्ये कोकाटे व वाजे यांची सेटींग झाल्याचं बोललं जात आहे. त्यावर कोकाटे यांनी यासगळ्या चर्चा फेटाळल्या आहेत.
कोकाटे यांच्या कन्या जिल्हापरिषदेच्या माजी सदस्या सिमंतिनी कोकाटे या मात्र उगले यांच्या प्रचारात चांगल्या सक्रीय आहेत. सिन्रर नगरपरिषदेची निवडणूक खासदार वाजे यांच्यासह राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, भाजपचे उदय सांगळे व हेमंत वाजे या सगळ्यांच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.