

Modi Foreign Policy Row Vikhe Targets Sonia Gandhi: अमेरिका आणि इस्रायलनं हवाई हल्ले करून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या केली. यावर काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, जागतिक घडामोडीवर लेख लिहून, मोदी सरकारला परराष्ट्र धोरणाची आठवण करून दिली.
सोनिया गांधी यांच्या या लेखाचे देशात पडसाद उमटले आहेत. भाजपकडून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अहिल्यानगरमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, 'काँग्रेस सरकारच्या काळात परराष्ट्र धोरणाची अधोगती झाली होती. पंतप्रधानांना बाहेर उभं राहावं लागत होतं,' याची आठवण करून दिली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "आखाती देशात युद्ध परिस्थितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. त्यानुसार देशाच्या सुरक्षिततेचा आढावा घेत, परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. जागतिक राजकारणात भारताचा जो सन्मान वाढला आहे, तो केवळ अन् केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे वाढला आहे." काँग्रेस काळात परराष्ट्र धोरणाची अधोगती झाली होती. देशाच्या पंतप्रधानांना देखील बाहेर उभं राहावं लागत होतं. परंतु आज देशाच्या पंतप्रधानांचं इतर देशात आग्रहानं स्वागत होतं, याकडे मंत्री विखे पाटलांनी लक्ष वेधलं.
'परराष्ट्रनीती बद्दल सोनिया गांधी बोलत आहेत. परंतु त्या ज्येष्ठ नेत्या आहेत. काँग्रेस (Congress) अध्यक्षा राहिल्या आहेत. मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. परंतु सरकारचं धोरण सुस्पष्ट आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. आपल्या देशाचं जागतिक पातळीवर ऐकलं जात आहे,' असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
'पंतप्रधान स्वतः युद्ध परिस्थिती निर्माण झालेल्या देशातील राजे, पंतप्रधानांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलत आहेत. आता यावर राजकारण करण्यापेक्षा, परिस्थितीचे तारतम्य ठेवून, आपल्या देशाचे नागरिक, जे आखाती देशात अडकले आहेत, ते पुन्हा कसे सुरक्षित परत येतील ते पाहिले पाहिजे,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.
"इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबाबत केंद्रातील मोदी सरकारचं मौन तटस्थता नाही. तर कर्तव्यात कुचराई आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत आणि विश्वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित होत आहेत", असे सोनिया गांधींनी म्हटलं आहे.
'संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय परिस्थिती बिघडली असताना सरकारच्या त्रासदायक मौनावर कोणताही विलंब न करता स्पष्ट आणि खुली चर्चा व्हावी,' अशी सोनिया गांधींनी अपेक्षा व्यक्त केली.
'या घटनेचे परिणाम भू-राजकारणाच्या पलीकडे होणार आहेत. भारताची भूमिका या दुर्घटनेला त्याचा मूक पाठिंबा दर्शवते. इराणच्या भूमीवर झालेल्या बॉम्बस्फोट आणि हत्यांचा काँग्रेस पक्षानं निषेध केला आहे. या युद्धाचे, जगभराला धोकादायक परिणाम होणार आहेत', असाही सोनिया गांधी यांनी इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.