
Sudhakar Badgujar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बडगुजर यांच्या जागेवर आता दत्ता गायकवाड यांना ठाकरे गटाने उपनेते पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पर्यायाने सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.
मात्र बडगुजर यांना पक्षात घेण्यास आमदार सीमा हिरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्र भाजप संघटनेच्या बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज (ता. ५) नाशिक दौरा आहे. तथापि ही बैठक केवळ संघटनात्मक नसून, ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश आणि आमदार सीमा हिरे यांच्यासह पक्षात निर्माण झालेला अंतर्गत विरोध याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा हा दौरा महत्वाचा मानला जातो आहे.
पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे व ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यात विधानसभेची लढत झाली होती. त्यात सीमा हिरे यांनी बडगुजर यांचा पराभव केला होता. बडगुजर-हिरे परस्परांचे विरोधक असल्याने पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. सलीम कुत्ता बरोबर नाचणाऱ्याला पक्षात घ्यायचं का असा सवाल करत सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला थेट विरोध केला आहे.
दरम्यान हाच तिढा सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा नाशिक दौरा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बडगुजर यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातील काय तो निर्णय आजच बावनकुळे यांच्या उपस्थिती घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, बडगुजर यांच्यावर एकुण १७ गुन्हे दाखल असल्याचा दावा सीमा हिरे यांनी केला आहे. शिवाय मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, त्यावरुन बडगुजर यांचा जनाधार स्पष्ट होतो असं सीमा हिरे यांनी नमूद केलं आहे.
सीमा हिरे यांनी अनेक गंभीर आरोप बडगुजर यांच्यावर केले आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या परदेश दौऱ्याशी संबंधित कॅसिनोतील फोटो बडगुजर यांनीच व्हायरल केले होते असा आरोप सीमा हिरे यांनी केला आहे. तसेच, भाजप नेते नारायण राणे यांना सार्वजनिक कार्यक्रमात अपमानित करण्याचा प्रयत्न बडगुजर यांनी केल्याचाही उल्लेख त्यांनी केला. अशा व्यक्तीसोबत आम्ही पक्षात एकत्र कसे राहू? असा थेट सवाल आमदार हिरे यांनी उपस्थित केला आहे. अशा व्यक्तीला पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं सीमा हिरे यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.