Sudhakar Badgujar : नाशिक पश्निम विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सीमा हिरे व सुधाकर बडगुजर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सीमा हिरे यांचा विरोध डावलून भाजप पक्षश्रेष्ठींनी बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. हिरे व बडगुजर हे दोघेही आता एकाच पक्षात आले असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर कणभरही कमी झालेलं नाही. त्याचीच प्रचिती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आली आहे.
सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मतदारसंघात एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. मंत्री गिरीश महाजन हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सीमा हिरे या अनुपस्थित राहिल्याने बडगुजर यांनी त्यांचे नाव न घेता महाजन यांच्यासमोरच त्यांच्यावर शाब्दिक फायरिंग केली.
गिरीश महाजन हे बडगुजर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाआधी सीमा हिरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यामुळे उशीर झाल्याचं बडगुजरांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. बडगुजर पुढे म्हणाले, 'मी खुर्ची टाकून बाहेर बसलो होतो, माझ्यात सहनशीलता आहे म्हणून काही बोललो नाही. पण मला माहित होतं की आज कोणीतरी मुद्दाम उशीर करणारच आहे. असा निशाणा त्यांनी सीमा हिरे यांचे नाव न घेता लगावला.
बडगुजर म्हणाले, आम्ही निवडणूक लढवली, त्यांनीही निवडणूक लढवली. आम्ही त्यांना ताई म्हणतो. गिरीश महाजन यांना उद्देशून बोलताना बडगुजर म्हणाले, मागील निवडणुकीत तुमच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना मदत केली होती. आज त्या कार्यक्रमाला आल्या नाहीत, त्या आल्या असत्या तर बरं वाटलं असतं.
बडगुजर यांनी आपल्या भाषणात केवळ सीमा हिरे यांच्यावरच नाही तर भाजपच्या इतरही काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, आपण माणसं मोठी केली, पण काही जण गेले. सतीश कुलकर्णी गिरीश महाजन यांच्यामुळे महापौर झाले. आज काही लोक इथलं शेण खातात आणि दुसरीकडे गरळ ओकत आहेत. स्वतःचे हात भ्रष्टाचाराने माखले आहेत. आम्ही तोंड उघडलं तर काय होईल माहीत नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण कोणी अंगावर आला तर शिंगावर घेणार भाऊ, तुम्ही सांगितलंत तर घेईन(गिरीश महाजन यांनी सांगितलं तर) असं ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.