Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महायुतीच्या किती जागा येणार याबाबत वावड्या आहेत. यामध्ये मतदान यंत्रांविषयी अनेकांच्या मनात संशय आहे. हा संशय दूर कोण करणार, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
चांदवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कोतवाल यांच्या प्रचारासाठी आज खासदार सुप्रिया सुळे यांची सभा झाली. यावेळी खासदार सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरण आणि कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, या पक्षाला सामान्य नागरिक, महिला आणि शेतकरी याविषयी काहीही आस्था नाही. त्यामुळे या सरकारला खाली खेचण्यासाठी येत्या निवडणुकीत जबाबदारीने मतदान करावे, असे त्या म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीत अनेक प्रकार घडले. त्याची अद्यापही चर्चा आहे. दिंडोरी मतदार संघात भास्कर भगरे एक लाख 13 हजार मतांनी विजयी झाले. मात्र दुसरी पास भगरे सरांना दाखवून अधिक मते मिळाली. साताऱ्यातही असाच प्रकार घडला. पिपाणी आणि तुतारी दोन्ही चिन्हांची मते एकत्र केली तर, त्या मतदारसंघात शशिकांत शिंदे हेच विजयी झालेले दिसले असते. म्हणजेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नऊ खासदार निवडून आले असते.
याबाबत स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील असेच काही तरी विधान केले आहे. ते म्हणाले, होय मी उपमुख्यमंत्री झालो. पण दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो. याचाच अर्थ काहीतरी घोटाळा आहे. गैरप्रकार आहेत. त्यामुळे मी म्हणेन, देवा भाऊ तुम्ही कॉपी करून पास झाला, हेच खरे आहे. सध्याचे सरकार लाडकी बहीण योजनेचा खूप गाजावाजा करते. मात्र ही बहीण आत्ताच कशी लाडकी झाली? असा प्रश्न त्यांनी केला. खरे तर, सर्वात लाडकी बहीण मी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मी लाडकी नव्हते. तुम्ही असा दणका दिला की, लगेच आता लाडकी झाले.
या लोकांना पंधराशे रुपये देऊन महिलांची मते विकत घेता येतात, असा भ्रम आहे. मात्र सगळीच नाती पैसे देऊन विकत घेता येत नाहीत. त्यांची अशी भावना होण्यामागे `50 खोके, एकदम ओके` हे कारण आहे. आमची ताकद मात्र आमची इमानदारी हीच आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आज जेष्ठ नेते शरद पवार रोज सहा ते सात सभा घेत आहे. काल तर त्यांनी सात सभा घेतल्या. ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या वयामध्ये त्यांना हे सर्व करण्याची आवश्यकता काय आहे?. त्यांना सत्ता मिळणार आहे का? ते मुख्यमंत्री होणार आहेत का? एक चांगली सत्ता आणि सरकार महाराष्ट्रात यावे, ही त्यांची तळमळ आहे.
राज्यात येणारे सरकार महिलांचा सन्मान आणि संरक्षण करणारे असावे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणारे असावे. शेतमालाला हमीभाव मिळेल, अशी व्यवस्था करणारे असावे. हीच त्यांची तळमळ आहे. पक्ष फोडून भाजपच्या सत्तेत सामील झालेल्या लोकांना काय हवे होते, हे स्पष्ट आहे. ते कितीही विकासाचा दावा करीत असले तरी, खरे तर त्यांना त्यांच्या घरचा विकास करायचा होता.
भाजपला एवढे पैसे देऊन आमदार विकत घेता येतात. ते त्यांचे धोरण असावे. हेच पैसे ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी का खर्च करत नाही. एवढे पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर, दूध, सोयाबीन, कांदा या सगळ्यांचाच प्रश्न सुटला असता. मात्र आता त्याची फार चिंता करण्याची गरज नाही. येत्या दहा दिवसात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे.
कांदा आयात, निर्यातीत चांदवड परिसरात मोठा भ्रष्टाचार होत आहे. अशा चिठ्ठ्या येतात. हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी शिरीष कोतवाल हे आमदार होताच सर्वात आधी त्यांनी ते काम हाती घ्यावे. त्यासाठी मतदारांनी कोतवाल यांना भरभरून मतदान करावे, असेही श्रीमती सुळे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.