CM Eknath Shinde Ayodhya Tour : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रथमच आयोध्या दौरा होत आहे. मुख्यमंत्र्याचा दौरा ९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी ते शनिवारी (ता. ८) लखनौला जाणार आहेत. दरम्यान आज (ता. ७) मुंबई, ठाणे आणि नाशिक येथून रेल्वेने शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. यात सुमारे तीन हजार शिवसैनिक, रामभक्त असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या शिवसैनिकांसह मुख्यमंत्री शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेने ४० आमदार आणि १३ खासदारांसह इतर पदाधिकाऱ्यांचाही सहभाग असणार आहे.
आगामी काळात लोकसभा, विधानसभेसह, मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. यात हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. राममंदिर हा कायम भाजप, शिवसेनेचा कळीचा मुद्दा राहिला आहे. महाराष्ट्रात असो की देशात त्यांनी कायम हा राजकीय मुद्दा केला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ता स्थापनेपूर्वी आणि नंतर असे दीड वर्षांच्या काळात तीन वेळा आयोध्या दौरे केले होते. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचाही अयोध्या दौरा गाजला होता.
ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी जाणीवपूर्वक नेण्यात आले नाही, अशी टीका विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह इतर आमदारांनी केलेली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदारांसह तब्बल तीन हजार शिवसैनिकांना सहभागी करून घेतल्याची चर्चा आहे.
ठाण्यातून निघालेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांनी भगवा झेंडा दाखविल्यानंतर रेल्वे अयोध्येसाठी रवाना झाली. यावेळी शिवसैनिकांनी 'जय श्री राम','चलो अयोध्या' असा जयघोष करण्यात आला. तर नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून अयोध्याकडे रवाना झालेल्या शिवसैनिकांना खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसर भगवेमय झाले होते.
'असा' असणार मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (ता. ८) अयोध्येसाठी रवाना होणार आहेत. ते सायंकाळी सहाच्या विमानाने लखनौला जातील. लखनौ येथे ते मुक्काम करतील. लखनौहून रविवारी (ता. ९) मुख्यमंत्री अयोध्येला हेलिकॉप्टरने जातील. तेथे ते प्रभू राम मंदिरातील महाआरतीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर मंदिराच्या बांधकामाला भेट देतील. त्यानंतर ते लक्ष्मण किल्ल्याला भेट देतील. तेथील संत-महंतांचे आशीर्वाद घेतील. किल्ल्याला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शरयू नदीवर आरती करणार आहेत. या कार्यक्रमांनंतर रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जेवण करतील. त्याच दिवशी मध्यरात्री शिंदे मुख्यमंत्री मुंबईला रवाना होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.