Pachora APMC News: पाचोरा- भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्वांर्थाने रंगली आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत होत असून, तीन्ही पॅनलकडून अस्तित्व व प्रभाव सिद्ध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला जात आहे. या सत्तासंघर्षात राजकीय नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांचा बाजार गरम झाला आहे. (APMC election is prestigious for all leaders)
ही निवडणूक जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील प्रमुख लढत आहे. येथे शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार किशोर पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी आहे. त्यांना त्यांच्या भगीनी वैशाली सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) राष्ट्रीय काँग्रेस (Congress) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना (Shivsena) या महाविकास आघाडीचे आव्हान आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना या तिघांमधील आघाडी उशिरा का असेना गठीत झाली. माजी आमदार दिलीप वाघ, काँग्रेसचे प्रदीप पवार व ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी आघाडीची वज्रमूठ बांधत बाजार समितीत वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांनी भाजपची काही मंडळींसोबत घेत सत्ता आमचीच, असा दावा करत दंड थोपटले आहेत. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या निर्धाराने प्रचारात आघाडी घेतली जात आहे.
मेळावे, बैठका व प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क या आधारे प्रचार केला जात आहे. आम्ही युतीमार्फत लढत आहोत असे सांगण्यात येत असले तरी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मात्र भाजप प्रणित स्वतंत्र पॅनल जाहीर करून आम्हीच खरी भाजप आहोत असा दावा करत प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या प्रचार पत्रकांवर मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील यांसह भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले आहेत.
आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून भाजपचे माजी जिल्हापरिषद सदस्य मधुकर काटे ,माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील हे प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी अभेद्य तर युतीत फूट असा सूर व्यक्त होत आहे. असे असताना सहकारात राजकारण नसते, असा गोंडस शब्दप्रयोग केला जात आहे.
समीकरण बिघडवणार
तीन पॅनलमध्ये प्रमुख लढत असली तरी सोसायटी सर्वसाधारण मतदार मतदारसंघात दोन, सोसायटी इतर मागास मतदारसंघात एक व व्यापारी मतदारसंघात दोन असे पाच स्वतंत्र उमेदवार असून, ते तीनही पॅनलचे समीकरण बिघडवतील. या स्वतंत्र उमेदवारांमुळे क्रॉस वोटिंगचा प्रकार व प्रमाण वाढेल, असा अंदाज राजकीय दिग्गजांकडून व्यक्त केला जात आहे. सत्ता आमचीच असा दावा तीनही पॅनलकडून केला जात असला तरी मतदारांमध्ये मात्र चलबिचल दिसत आहे. मतदार उघडपणे मते व्यक्त करत नसून मतपेटीच्या माध्यमातून योग्य व शेतकरी हित जोपासणाऱ्या आणि बाजार समितीला गतवैभव मिळवून देणाऱ्या नेतृत्वालाच मतदार पसंती देतील, असा सूर दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.