Nashik Politics : निवडणुकीत हरला, आता वाटलेलं सोनं मागतोय परत, पराभूत उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
Nashik Politics : लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत मतदारांना खुश करण्यासाठी प्रलोभनं दाखवली जाणं काही नवीन नाही; पण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये समोर आलेला प्रकार सर्वांना थक्क करणारा आहे.
एका उमेदवाराने त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान मतदारांना सोन्याचे वाटप केले होते, परंतु निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता हा उमेदवार चक्क मतदारांच्या घरी जाऊन दिलेले सोने परत मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नाशिक जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यातून मतदारांचे मनोरंजनही होत आहे.
नेमका प्रकार काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या एका उमेदवाराने मतदारांनी आपल्याला मतदान करावे यासाठी सोने वाटप केले होते. मात्र, या उमेदवाराचा निवडणुकीत पराभव झाला. आपला पराभव जिव्हारी लागलेल्या या उमेदवाराने आता मतदारांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही मला मतदान केलं नाही असा आरोप हा उमेदवार मतदारांवर करत आहे.
व्हायरल व्हिडिओत काय दिसतय ?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो उमेदवार एका गल्लीत काही लोकांशी हुज्जत घालताना दिसत आहे. मी कुठे सोने वाटायला गेलो नाही. तुम्ही लोकांनी माझ्या घरात येऊन सोनं घेऊन गेले आहात. 'माझ्या घरातून नेलेले सोने परत करा," असे तो संतापून सांगत आहे. तर दुसरीकडे, स्थानिक नागरिक या प्रकाराचा व्हिडीओ कॅमेरात कैद करत असून संबधित उमेदवाराला काही सवाल करताना दिसत आहे.
स्थानिक नागरिक पराभूत उमेदवाराला विचारत आहेत की, तुझ्या घरी येऊन चोरी केली का आम्ही? तू आमच्या गल्लीत येऊन जातीयवाद करत आहे, आमच्या जातीला धमक्या देत आहेस. "निवडून न आल्यावर अशा प्रकारे घरी येऊन सोने परत मागणे हे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तसेच तू तुझ्या चुकीमुळे निवडणुकीत पडला असे पराभूत उमेदवाराला सांगताना दिसत आहे.
निवडणूक आयोग दखल घेणार का?
दरम्यान हा सोशल मीडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर वेगवेळ्या व संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मतदारांनी अशा प्रकारे आमिषाला बळी पडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी पराभूत उमेदवाराच्या या कृतीची खिल्ली उडवली आहे. 'सोने देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न' लोकशाहीसाठी योग्य नसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसरात गमतीशीर चर्चा होत आहे. यावर आता निवडणूक आयोग किंवा स्थानिक प्रशासन काही कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

