
Jalgaon Politics | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. त्यादृष्टीने शिवसेना ठाकरे गटानेही आज चार उपनेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेल्या गुलाबराव वाघ यांना बढती देत त्यांची थेट पक्षाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी गुलाबराव वाघ यांची उपनेतेपदी निवड केल्याचे बोलले जात आहे.
नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी दुसरा मोठा निर्णय घेत चार उपनेत्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यात गुलाबराव वाघ यांचाही समावेश आहे. उपनेते पदासोबतच रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आधी गुलाबराव वाघ हे गुलाबराव पाटलांचे निकटवर्तीय मानले जात. पंरतु ज्यावेळी शिवेसेनेत फूट पडली त्यावेळी गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र गुलाबराव वाघ हे मात्र ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी गुलाबराव वाघ यांनी दर्शवली होती.
मात्र महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुलाबराव देवकर यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली. मात्र गुलाबराव वाघ यांनी नाराज न होता, महाविकास आघाडीचे काम केले. प्रसंगी, शिंदे गटाचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जाहीर सभांमध्ये आक्रमक पवित्रा घेण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्याचेच फळ म्हणून त्यांना उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
धरणगावात विद्यार्थी सेनेच्या शाखेची स्थापना १९८४ मध्ये झाली. त्याच काळात गुलाबराव वाघ शिवसेनेशी जोडले गेले. गुलाबराव वाघ यांना सुरुवातीला शिवसेनेचे धरणगाव शहर प्रमुख, एरंडोल उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख तसेच उपजिल्हा प्रमुख, जिल्हाप्रमुख, अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर गुलाबराव वाघ यांनी तब्बल २० वर्ष जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली आहे. अलीकडील तीन वर्षांपासून ते जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. गुलाबराव वाघ हे एरंडोलचे शिवसेना तालुका प्रमुख असताना मंत्री गुलाबराव पाटील तेव्हा उपतालुका प्रमुख होते.
उत्तर महाराष्ट्रात विशेषतः जळगाव जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने गुलाबराव वाघ यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून थेट उपनेतेपदी बढती देण्यात आली आहे. हा निर्णय शिंदे गटाला थेट टक्कर देण्याच्या रणनीतीचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुलाबराव पाटील यांना प्रतिस्पर्धी नेतृत्त्व उभं करण्याचा हेतूही यामागे असल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.