मालेगाव : सत्ता गेल्याचं दुःख मला नाही. मात्र, चांगलं काम करणारं सरकार तुम्ही गद्दारी करून पाडलं आणि निर्लज्जासारखं छत्रपतींचा भगवा हातात घेऊन नाचता तुम्ही. खंडोजी खोपड्याची अवलाद. तुम्हा गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही. आजची ही गर्दी पाहता माझ्यावर प्रेम करणारा एकही शिवसैनिक घेऊन जाऊ शकलेला नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांवर हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray criticizes Chief Minister and rebel MLAs again in bitter words)
उद्धव ठाकरे यांची आज (ता. २६ मार्च) मालेगावमध्ये सभा झाली. त्या सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री बनण्यासाठी नाही; तर जनतेसाठी लढत आहे. कोरोनाच्या काळात दोन ठिकाणी काळाचा ठोका चुकला होता, एक मालेगाव आणि दुसरे धारावीमध्ये. त्यावेळी मी धर्मगुरुंशी अगदी मौलावींशीही बोललो. त्यावेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य केले नसते, तर आज मालेगाव वाचले नसते. मी घरात बसून सांगितले, ते तुम्ही ऐकलं, त्याबद्दल आभार.
तुम्ही जे प्रेम आम्हाला देत आहात, ते गद्दारांना मिळत असेल असे मला वाटत नाही. हे प्रेम भाड्याने किंवा विकत आणता येत नाही. जगराहटी अशी असते की, लोकं सत्तेकडे जातात. पण अद्वैत हिरे हे भाजप सोडून आज शिवसेनेकडे आले आहेत. भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील दुवा आपल्यासाठी महत्वाचा आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.
मी म्हणतो कांद्याला (बंडखोर आमदार सुहास कांदे यांना उद्देशून) भाव मिळाला. कांद्याची खरेदी केली. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी केली नाही का. एक कांदा पन्नास खोक्यांना जात असेल, तर तुम्हाला तुमच्या कष्टाचे आणि कामाचे किती खोके मिळाले पाहिजेत. आपल्या सरकारने कर्जमाफी योजना राबवली होती. त्याचा फायदा द्राक्षबागांना मिळाला नव्हता. पण, दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले होते. नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदानाची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. पण आपलं सरकार गेलं. आम्ही पाचव्या वर्षापर्यंत दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे माझे स्वप्न होते. मात्र, गद्दारांना माती खाल्ली, असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात आवाज उठवा, असे आवाहन कृष्णा नावाच्या शेतकऱ्याने पत्राद्वारे केले होते. मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन दोन हेलिपॅड. माझा शेतकरी मात्र रात्री शेतात जातो, त्याला दिवसा वीज मिळत नाही. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. कृषीमंत्री कुठे दिसतात का. त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांना किती फटका बसला हे काळोखात जाऊन पाहतात. असे हे दिव्यदृष्ठी लाभलेले कृषीमंत्री म्हणून लाभले आहे. ते महिलांना शिवीगाळ करतात. सुप्रिया सुळे यांना शिवी दिली, तरीसुद्धा ते निर्लज्जासारखे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि हे यांचे हिंदुत्व, असा सवाल ठाकरे यांनी शिंदे यांना विचारला.
ठाकरे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे द्राक्षे नासली आहेत. मात्र, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर हे ‘अवकाळी पावसाचा फटका काही विशेष नाही. आम्ही शेतकऱ्यांना भरपाई देऊन टाकू,’ असे म्हणतात. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे अजून पंचनामेही झाले नाहीत. महाआघाडी सरकारच्या काळात वेगात पंचनामे करून आम्ही शेकऱ्यांना मदत करत होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.