
Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत : तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा पदाधिकारी पक्षात नाराज असल्याचा दावा केला होता. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून चार महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना, पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक), सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी-कोकण) यांना उपनेतेपदी संधी देण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या नियुक्त्यांबाबत माहिती देण्यात आली. गुलाबराव वाघ यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर (लोकसभा) व नंदुरबार जिह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दत्ता गायकवाड यांना नाशिकमध्ये उपनेते पदाची जबाबदारी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा दत्ता गायकवाड यांनाच फोन आला होता. यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची माहिती गायकवाड यांना राऊतांनी दिली. त्यानंतर गायकवाड यांनीच पत्रकारांना माहिती देत बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली होती.
दत्ता गायकवाड हे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्याकडे नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाचा कार्यभार होता. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गायकवाड यांची ताकद आता वाढली आहे.
दरम्यान बडगुजर यांनी यासंदर्भात मात्र वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. पक्षसंघटनेच्या काही निर्णय प्रक्रियेत मला सामाविष्ट करुन घेतले नाही. म्हणून मी नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करण्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर मी ती स्विकारतो. मी नाशिकबाहेर असल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही. याबाबत मी जिल्हाध्यक्षांना पूर्वसूचना दिली होती. मात्र मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणूनच जर माझ्यावर कारवाई झाली असेल, तर ती गोष्ट निश्चितच चुकीची आहे असेही बडगुजर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बडगुजर यांची हकालपट्टी होताच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली मात्र, आमदार सीमा हिरे यांनी त्याला विरोध केला होता. त्यापाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटाकडूनही बडगुजर यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे बडगुजर यांची कोंडी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.