Nashik News : नाशिकचे विख्यात श्री काळाराम मंदिराला आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त गाठून दोन राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरविले आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे नाशिकच्या विख्यात काळाराम मंदिरात सायंकाळी दर्शन घेतील. यावेळी श्री ठाकरे काळाराम मंदिराच्या इतिहासातील एका वेगळ्या पैलूला हात घालून इतिहास घडवतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता. त्याचे यंदा शताब्दी वर्ष आहे. या सत्याग्रहाची स्मृती म्हणून काळाराम मंदिराच्या भिंतीला एक शिलालेख लावण्यात आला आहे.
राज्याचे तत्कालीन सामाजिक कल्याण विभागाचे मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत हा शिलालेख लावण्यात आला होता. सामान्यता मंदिरात जाणाऱ्या बहुतांशी लोकांचे याकडे दुर्लक्ष होते. मात्र श्री ठाकरे मंदिरात जाताना, समाजातील दबलेल्या, पिचलेल्या, शोषित व पीडीतांना सुद्धा प्रवेश मिळायला हवा, यासाठीच्या सत्याग्रहाची साक्ष देणाऱ्या या शिलालेखाला देखील अभिवादन करणार आहेत.
यासंदर्भात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकली आहे. "जसे तुम्ही सुद्धा दोन हाताची दोन पायाची माणसं आहात. तशीच आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच दोन हाताची दोन पायाचे माणसं आहोत"हा सरळ साधा मानव मुक्तीचा विचार सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ उभी केली होती.
'सामाजिक इतिहासाची ही एक जखम देखील आहे. ठाकरे हे असे पहिले नेते आहेत, जे या जखमेवर हळुवार फुंकर घालून सामाजिक एकतेचा व जातपात विरहित समाज निर्मितीचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश नाशिकमध्ये देणार आहे'. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिराच्या पूजेच्या निमित्ताने एक वेगळा राजकीय आणि सामाजिक संदेश देण्यात त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरेल.
Edited By : Rashmi Mane