
Jalgaon Politics : अॅड. उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. आता त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र निकम यांना केंद्रात मंत्री केलं तर रक्षा खडसे यांना त्यांचे मंत्रिपद सोडावे लागेल अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासंदर्भात भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी एक सूचक विधान केलं आहे.
गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासंदर्भात त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, त्यांची राज्यसभेवर नियुक्ती होताच मी त्यांना फोन केला होता. त्यांचे अभिनंदन आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. याचे दुख: आम्हा सर्वांनाच होते. उज्वल निकम हे माझे चांगले मित्र असून ते आता राज्यसभेवर गेले आहेत. ते मोठे वकिल आहेत, त्यांनी राज्यात आणि देशात मोठे चांगले काम केलेले आहे. दहशतवादासंदर्भातील केसेस, देशद्रोह्यांबाबतच्या केसेस ते लढले आहेत. त्यांची राज्यसभेवरील नियुक्ती केवळ खासदारकीसाठी नसेल..त्यामुळे होऊ शकते, काही अशक्य नाही असे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.
दरम्यान यामुळे मात्र जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. अॅड. उज्वल निकम यांना राज्यसभेवर घेतल्याने जळगावात तीन खासदार झाले आहेत. त्यापैकी खासदार रक्षा खडसे या केंद्रीय राज्य मंत्री आहेत. त्यामुळे शक्यतो एका जिल्ह्यात दोन केंद्रीय मंत्रीपदे दिली जात नाहीत, अशा परिस्थिती रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण होऊ शकतो का? असा प्रश्न गिरीश महाजन यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मला तसे वाटत नाही..आम्ही पण भाजपचे दोन लोक इथे आहोत. एकेका राज्यात तीन-चार मंत्री आहेत. त्यामुळे कोणता धोका असेल, असे मला वाटत नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत. कुणाला मंत्री करायचे, कुणाला करायचे नाही, कुणाला काढायचे, कुणाला ठेवायचे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील असं महाजन म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उज्वल निकम यांच्या नावाला कायमच प्राधान्यक्रम कायम राहिला आहे. उज्वल निकम यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भाजपकडून उज्वल निकम यांची पुन्हा राज्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर भाजपने त्यांना आता राज्यसभेवर घेतलं. देशातील अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी निकाली काढले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं जावू शकतं. गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेतूनही ते स्पष्ट होते.
त्यामुळे गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे एकतर अॅड. उज्वल निकम व रक्षा खडसे हे दोघेही मंत्री राहू शकतात. किंवा राजकीय वर्तुळातील चर्चा खरी ठरल्यास व पक्षश्रेष्ठींनी रक्षा खडसे यांचे मंत्रिपद काढून घेतल्यास तो त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. परंतु रक्षा खडसे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जावू शकते. असंही बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.