Political News : केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव आणला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. सत्ताधारी ईडी कारवाईचा धाक दाखवत विरोधी पक्षाच्या नेत्यांना राज्य सरकारकडून धारेवर धरले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी आता सत्ताधाऱ्याना लक्ष केले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची ताकद ओळखून आहेत. त्यामुळे शरद पवारासोबत असलेल्यांवर ईडीची कारवाई करण्यात येते. दबाव टाकला जातो. पण त्याचा उपयोग नाही. आमची राष्ट्रवादी हीच खरी असून, पदाधिकारी व कार्यकर्तेचे शरद पवारांवरील प्रेम आजही कायम आहे. शरद पवारांच्या सभांना होणारी गर्दी याची साक्ष देते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini khadse ) यांनी व्यक्त केले.
नाशिकमध्ये आयोजीत महिला कार्यकर्ता मेळाव्यासाठी त्या उपस्थित होत्या. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि महिला शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. राम मंदिराचे काम अपूर्ण असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले. तरीही भाजपला सोहळ्याची घाई झाली आहे. राम मंदिर सोहळ्याचा इव्हेंट केला जातो आहे. खरंतर, राम सर्वांचा आहे. माझ्या वडीलांनी (एकनाथ खडसे) (ekanath khadse ) कारसेवक म्हणून अनेक वर्ष रामाची सेवा केली. मी सुद्धा राम भक्त आहे.
अयोध्येतील गर्दी कमी झाली की दर्शनाला जाणार असल्याचे खडसे म्हणाल्या. दरम्यान, लोकसभेच्या जागांसाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. आपण गेल्या चार वर्षापासून विधानसभेसाठी तयारी करीत आहोत, असे सांगत त्यांनी आपल्या पुढील वाटचालीचा संकेत दिला.
मराठा, धनगर, लिंगायत अशा वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर दाखवून सरकार झुलवत आहे. केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करून निर्णय घेऊ शकते. मात्र, तसे होत नाही. सरकारचा हेतू आरक्षण देण्याचा नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे. सरकारची इच्छाशक्ती कमी पडत असल्याची टीका खडसे यांनी यावेळी केली.
(Edited By : Sachin Waghmare)