Dr Hire Vs Bhuse: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ अद्वय हिरे यांनी काल पुन्हा शक्ती प्रदर्शन केले. पालकमंत्री भुसे यांच्या मतदारसंघात थेट सरपंच परिषद घेतली. यावेळी सरपंचांची मोठी गर्दी झाली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांना हिरे यांनी काल पुन्हा एकदा आव्हान दिले. मालेगाव बाह्य मतदारसंघातील दुरावस्था आणि भ्रष्टाचार हा त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दा होता. पालकमंत्र्यांनी आभासी विकास केल्याचा आरोप डॉ हिरे यांनी यावेळी केला.
मालेगाव बाह्य मतदारसंघात डॉ हिरे आणि भुसे यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. गेले वर्षभर पालकमंत्री भुसे यांनी डॉ हिरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारींचा ससेमीरा लावला होता. त्याला आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील सरपंचांची परिषद डॉ हिरे यांनी घेतली. या परिषदेला अनेक सरपंच आणि उपसरपंचांनीहजेरी लावली. त्यामुळे पालकमंत्री भूसे यांना हे आव्हान मानले जाते. यावेळी अनेक सरपंचांनी अधिकारी आणि मंत्र्यांच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्या.
या परिषदेला काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यादेखील उपस्थित होत्या. मात्र एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संताप अनावर झाला. सर्व अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी बटीक केले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
या बटीक अधिकाऱ्यांना सरपंच आणि जनतेच्या समस्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यामुळे गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांबाबत विशेषाधिकार भंगाची तक्रार करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
डॉ हिरे जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणात नऊ महिने तुरुंगात होते. त्यानंतर जामीनावर बाहेर आले. जामीनावर बाहेर येताच त्यांनी आपल्याला राजकीय षडयंत्र म्हणून अडकविण्यात आले. पालकमंत्री भुसे हे त्याचे सूत्रधार असल्याचा दावा केला. आगामी निवडणुकीत आपण त्यांचा पराभव करून या सूडाचा वचपा काढू, असा इशारा दिला.
पालकमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यांनी केले. मालेगावमध्ये औद्योगिक वसाहत उभारण्यात आली. मात्र कोणीही उद्योजक तिथे यायला तयार नाही. कारण जो उद्योजक येईल त्याच्याकडे पालकमंत्री भागीदारी मागतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळेच कोणीही उद्योजक इकडे यायला तयार नाही.
त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही. तरुणांपुढे अनेक समस्या आहेत. त्याची सोडवणूक करायला कोणीच वाली नाही. मतदारसंघात सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले आहेत. चांगल्या डांबरी रस्त्यांचे खोदकाम करून त्यावर ठराविक कंत्राटदारांचे सिमेंट ओतण्यात आले आहे. याच काँक्रीटवर पुन्हा नाल्या खोदल्या जात आहेत.
ठराविक चार-पाच मंडळीची सर्व कामे करतात. कोणीही सुशिक्षित बेरोजगाराला निविदा भरू दिली जात नाही. हे सर्व भ्रष्टाचाराचे आणि आभासी विकासाचे काम आपण उघडे पाडू असे आव्हान हिरे यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, महेश पवार, नंदू सोनवणे, चंद्रकांत अहिरे, मदन सपकाळ, एकनाथ भोसले, शरद खैरनार, समाजवादी पक्षाचे नेते मुष्तकीन डीग्निटी आदींनी राज्यातील महायुतीचे सरकार आणि पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.