Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या विविध गावांमध्ये रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
तालुक्यातील अनेक भागात रविवारी दुपारी मोठ्या गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यात उभी पिके अक्षरशः आडवी झाली. आमदार लंके यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना मेलवर पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांसाठी हा बिकट काळ असून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार लंके यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ''रविवारी दुपारी पारनेर-नगर मतदारसंघातील पारनेर, पानोली, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगणथेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगांव, म्हसणे सुलतानपुर, गटेवाडी, पठारवाडी, लोणीमावळा या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपीटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ''
याशिवाय ''पारनेर-नगर मतदारसंघातील गावांमध्ये जुन-जुलै व ऑगस्टमध्ये अजिबात पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे एक पीक वाया गेले होते. त्यानंतर काही गावांमध्ये झालेल्या पावसावरच शेतकऱ्यानी पेरण्या केल्या होत्या. ही पिके आता हाताशी आलेली असतानाच या अवकाळी, वादळी पाऊस व गारपिटीमुळे ही पिकेही वायाला गेली आहेत. पिकांबरोबरच फळबागा, रब्बी व नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. '' असंही सांगण्यात आलं आहे.
याचबरोबर ''पारनेर तालुका हा आगोदरच दुष्काळी, पठारी व आदीवासी भाग आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशास्थितीत गारपीट व अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचे तत्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित विभागास द्यावा'' ,अशी मागणी आमदार लंके यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे.
जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, प्रांताधिकारी गणेश राठोड, तहसिलदार गायत्री सैंदाणे यांनाही पत्र पाठवून आमदार लंके यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले आहे.
वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन झालेल्या नुकसानीची आमदार नीलेश लंके, दीपक लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांनी रविवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत या मागणीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार लंके यांनी आश्वास्थ केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.