Jalgaon Political News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांनी जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीला बळ मिळाले आहे. यानंतर वारंवार पुढे ढकलण्यात येणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. या वेळी पवार आणि ठाकरेंना महायुतीतील नेते काय उत्तर देणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष आहे. (Latest Political News)
राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुती आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरू आहे. उद्धव ठाकरेंची सभा झाली की, तेथे एकनाथ शिंदे तर शरद पवारांना अजित पवार प्रत्युत्तर देतात अशा सभा होत आहेत. काही ठिकाणी 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे संयुक्तपणे विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहेत. बीड, कोल्हापूर येथे अशा सभा पार पडल्या आहेत. (Maharashtra Political News)
जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या जोरदार सभा झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांच्या सभेला नागरिकांचा माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यांनी जोरदार हल्ले चढवून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना मोठे बळ मिळाले आहे. या सभांना सत्ताधारी कसे प्रत्युत्तर देणार, याकडे लक्ष आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंचा पाचोरा येथे 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आतापर्यंत हा कार्यक्रम चार वेळा पुढे ढकलण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) वेळ नसल्याने हा कार्यक्रम होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी १२ सप्टेंबर ही तारीख दिल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम झाला तर महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या सभांना काय उत्तर देणार याकडे जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.