नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shivsena MLA Suhas Kande) यांनी मोठी राजकीय मोहीम (Political Drive against Bhujbal) उघडली आहे. त्यांचे पालकमंत्री पद काढा (Remove him as Guardian Minister) यापर्यंत ती गेल्याने आश्चर्य वाटणारच. भुजबळ या राजकीय ढाण्या वाघाच्या शिकारीसाठी (Hinting of Tiger) आरोपांचे हाकारे पिटणारे कांदे यांच्या खांद्यावर ही बंदूक (Gun On Kande`s Shoulder) कोणी ठेवली असेल? हा गंभीर राजकीय प्रश्न आहे.
नांदगाव मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेले सुहास कांदे यांची राजकीय पत व पूर्वचारित्र्य पाहता, त्यांच्यात एव्हढी हिंमत अन् बळ नाही हे शेमडे पोर देखील सांगेल. मग प्रश्न पडतो त्यांच्यात एव्हढे बळ, पत्रकारांना देण्यासाठी शासकीय परिपत्रकांच्या थप्प्या, उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यासाठीची शक्कल व मुद्दे येतात कुठून? हा प्रश्न पडतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नांदगावच्या निमित्ताने निघालेली ही बात `बहुत दूर तक गई है` त्यात आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातच नव्हे तर थेट मंत्रीमंडळाच्या बैठकीपर्यंत पोहोचली आहे. काल श्री. कांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, गट नेते विलास शिंदे हे नेते हजर होते. त्याला उत्तर देण्यासाठी श्री. भुजबळ यांचीही पत्रकार परिषद झाली. दोन्ही पत्रकार परिषदांतील फरक म्हणजे कांदे नवखे असले तरी त्यांच्या समवेत शिवसेनेची स्थानिक वजनदार मंडळी होती. भुजबळ प्रभावी असले तरी त्यांच्या समवेत सामान्य मंडळीच दिसली. शिवसेनेत पक्षाचा आदेश असल्याशिवाय पानही हालत नाही. ही मंडळी संजय राऊत यांना विचारल्याशिवाय डोळ्याच्या पापणीची उघड झापही करीत नाही, त्यातील काहींना कंठ फुटला होता. हा वेगळाच संदेश आहे. त्यावर कांदे यांची प्रतिक्रीया होती, `ही तर सुरुवात आहे`
या विवेचनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादाची एक अदृष्य पार्श्वभूमी आहे. ती कधी उघड झाली नाही. मात्र गतवर्षी कोरोनाची साथ सुरु होण्याआधी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ वगळता, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर व नितीन पवार या राष्ट्रवादीच्या चारही आमदारांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे श्री. भुजबळ यांच्याएैवजी अन्य कोणाला तरी पालकमंत्री करावे अशी मागणी केली होती. त्यातील बहुतांश तक्रारी व श्री. कांदे यांच्या तक्रारींत साम्य असल्याचा योगायोग आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अशी भरभक्कम बिरुदावली मिळविणाऱ्या भुजबळ यांनी राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात "अनभिषिक्त सम्राट" म्हणावे अशा गतीने कारभार हाताळला. ते ओबीसींचे नेतृत्व करतात. मात्र सबंध महाराष्ट्र व सर्व घटक त्यांना नेता मानते हे वास्तव आहे. त्यांचा राजकीय दबदबा पाहता त्यांच्या विरोधात 'ब्र' शब्द काढण्याची हिंमत नसते. जिल्ह्यातील (कै) डॅा वसंत पवारांसह अनेक पात्र नेत्यांना केवळ भुजबळ यांची मर्जी नसल्याने राजकीय त्रास झाला होता. तर केवळ भुजबळ यांची मर्जी म्हणून जयंत जाधव, रवींद्र पगार, रंजन ठाकरे अशा सामान्य वकुबाच्या अनेकांना पदांची लॅाटरी लागलेली जिल्ह्याने पाहिले. हे राजकारण तेव्हाही कोणाला पसंत नव्हते. मात्र कोणाचे काही चालले नाही. आज शिवसेनेतील एक कांदे येतात व भुजबळांना हैराण करतात, हे त्यामुळेच सहज पचनी पडणारे नाही.
दोनदा नांदगावचे आमदार असलेले भुजबळ पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव करून आमदार झालेल्या सुहास कांदे यांनी भुजबळ यांच्या विरोधात आरोपाची राळ उठविली आहे. एव्हढेच नाही तर थेट न्यायालयात धाव ही घेतली. आमदार कांदे हिम्मतवान असले तरी थेट भुजबळ यांच्या विरोधात दंड थोपटणे सोपे नाही. म्हणूनच मागील पाच वर्षात अनेक संकटे झेलून आता कुठे मोकळा श्वास घेणाऱ्या भुजबळांच्या विरोधात उघड भूमिका घेण्याची हिंमत कांदे यांना कोणी दिली? भुजबळांवर ताणलेली त्यांच्या खांद्यावरील बंदूक कोणाची व त्यात गोळ्या कोणी ठासल्यात. स्वपक्षीय, आघाडीतील की विरोधकांनी.
खरे तर श्री. भुजबळ आणि कांदे यांच्यात प्रदिर्घ काळ वाद सुरु होताच. त्याला राजकीय वाद म्हणावा असा तो नव्हता. तो वाद वेगळाच होता. अगदी पंकज भुजबळ यांचा पराभव झाला तरी टोकाचे मतभेद कधीच नव्हते. श्री. भुजबळ यांनी ठाकरे कुटुंबियांसोबतचे मतभेद संपुष्टात आणले, ते भुजबळ आमदार कांदे यांच्याशी तुटे पर्यंत ताणतील ही शक्यता फारच कमी. तसे भुजबळ यांनी यापूर्वी व काल देखील हे प्रकरण संपले. माझे त्यांच्याशी मतभेद नाहीत, असे जाहीर करून टाकले आहे. कांदे यांची कारणे देखील लटकी वाटतात. मात्र आगीत सातत्याने तेलाचा शिपकारा मारण्याचे काम कांदे थांबवत नाहीत. राजकारणात तेही महाआघाडीतील दोन नेत्यांत असे घडते तेव्हा ती धोक्याची घंटा मानली जाते.
मुळातच एखादया मंत्र्याने, आमदाराने, खासदाराने, महापौरच काय अगदी सरपंचाने देखील आपल्या पक्षाच्या, नात्या गोत्यातील ठेकेदार, कार्यकर्त्यांना आपल्या पदाचा उपयोग करून आणि पक्षाचा कार्यकर्ता नसला तरी एखादया मर्जीतल्या ठेकेदाराला काही कामे देणे हे काही नवीन नाही. सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी हे होतेच. सध्या ही केंद्र सरकार आपल्या मर्जीतील मोजक्याच ठेकेदार, उद्योगपतींना काम देत असल्याचे आरोप होतच आहेत. फरक एक आहे. भाजपचे गिरीष महाजन पालकमंत्री व बाळासाहेब सानप आमदार असताना जी कंत्राटदार मंडळी त्यांचे विश्वासू होते, त्यांची भुजबळ फार्मवर वर्दळ आहे. ही मंडळी व्यावसायिक असतात. त्यामुळे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. हाच आक्षेप कांदे यांनी देखील घेतला आहे. हा दुसरा योगायोग.
या प्रकरणावरून तीस वर्षांपूर्वीचे राजकारण आठवते. मुंबईचे उपायुक्त गो. रा. खैरनार ही सामान्य व्यक्ती अचानक चर्चेत येऊन माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत, असे सांगत एका मोठ्या नेत्यावर आरोप करीत सुटली होती. खरे तर खैरना व त्या नेत्यांचा काही संबंधही नव्हता. (कै) गोपीनाथ मुंडे असेच शरद पवार यांच्या विरोधात आरोप करीत फिरत होते. नंतर कळले, ना त्या आरोपात तथ्य होते ना त्यांच्याकडे पुरावे होते. त्यानंतर भुजबळ यांनी युतीचे राज्य असताना, विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अशीच राळ उडवली होती. तत्कालीन गृहमंत्री (कै) मुंडे यांच्या विरोधात त्यांचे अभिनयासह उच्चारले जाणारे `लॅा आणि ऑर्डर` या शब्दावरील कोटी म्हणजे, `ला आणि ऑर्डर`. श्री. भुजबळ बोलायला उभे राहिले की, त्यांना ऐकण्यासाठी तेव्हाचे अजित पवार, दिलीप वळसे पाटील ही विधानसभेतील तरूणांची टीम धावत धावत प्रेक्षक गॅलरीत येत असत. शिवसेना-भाजप युतीचे राज्यातील पहिले सरकार घालविण्यात आर. आर. पाटील (विधानसभा) व भुजबळ (विधान परिषद) यांचे योगदान मोठे. त्यात भुजबळांचा आक्रमकपणा शिवसेनेला बोचणारा असल्याने बी ३ बंगल्यात त्यांच्यावर झालेला हल्ला देशभर चर्चेत आला होता. हे सांगण्याचे कारण म्हणजे आज तेच भुजबळ नाहीत. त्यामुळे या प्रसंगातही ते फिनीक्स सारखे झेप घेऊन हे विरोधकांचे राजकारण मोडून काढतील की बळी पडतील ही प्रत्येक राजकीय कार्यकर्ता, भुजबळ यांच्यावर प्रेम करणाऱ्याला उत्सुकता आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.