
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकीय डावपेचातील जाणकार समजले जातात. पण, एकनाथ खडसे यांच्यासारख्या ‘मन भाजपमध्ये आणि शरीर राष्ट्रवादीत’असलेल्या नेत्याच्या कुटुंबाचे ‘बॅगेज’पवार वागवत आहेत, हे अनेकांना न सुटलेलं कोडं आहे. नेमके शरद पवार यांचे या मागील गणित काय आहे हा प्रश्न अनेकांना पडतो.
पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देऊनही शरद पवारांनी खडसे यांची आमदारकी आजूनही कायम ठेवली आहे. शिवाय त्यांच्या मुलीला अर्थात रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावर स्थान दिलं आहे. शरीराने खडसे राष्ट्रवादीत असले तरी त्याचं मन मात्र भाजपात आहे. भाजपमध्ये जाण्याची अनेकदा इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे, त्यासाठी जीवाच्या आकांताने त्यांनी प्रयत्नही केले आहेत. मात्र भाजपने आजूनही त्यांना झुलवतच ठेवलं आहे तो भाग वेगळा.
खडसेंनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आमदारकी मिळवून राजकीय पुनर्वसन करुन घेतलं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते आपली सून रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या. रक्षा खडसेंना निवडून द्या म्हणून मतदारांना आव्हान केलं. खडसेंचा हा सगळा आटापिटा पुन्हा भाजपात जाण्यासाठी होता. मात्र भाजपने त्याहीवेळेला त्यांना टाळलं.
राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर पडत्या काळात उत्तर महाराष्ट्रातील एकनाथ खडसे यांच्या सारखा मात्तबर नेता शरद पवारांना लाभला, ही तशी पक्षाच्या दृष्टीने महत्वाची बाब होती. पण, खडसेंचा पवारांना त्यादृष्टीने काहीही उपयोग झाला नाही. ऐन लोकसभा निवडणुकीलाच त्यांनी स्वत:ची सून व भाजपच्या उमेदवार असलेल्या रक्षा खडसेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यामुळे महाविकास विकास आघाडीच्या उमेदवाराला खडसेंचा काहीही फायदा झाला नाही.
अशा नेत्याचा पक्षात उपयोग शरद पवार कशासाठी करत असावेत? उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी मतांची समीकरणं, स्थानिक सत्तास्थापनेसाठीचे गणितं यामुळे पवार खडसेंना वागवत आहेत, हे अनेकांचं विश्लेषण आहे. परंतु प्रत्यक्षात आजवर खडसेंचा पवारांना त्यादृष्टीने काहीही उपयोग झालेला नसल्याचं जाणकार सांगतात. भाजपनेही खडसेंच्या ऐवजी उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्यासारखे नेतृत्व उभं केलं आहे. विधानसभा व लोकसभेला जळगावात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने चांगलं यश मिळवलं. त्यामुळे भाजपलाही आता खडसे यांची कोणतीही उणीव भासत नाही.
राजकीय विजनवासात जाण्याची स्थिती असताना शरद पवारांनी खडसे कुटुंबाला आधार दिला. एकनाथ खडसेंना आमदार करुन राजकीय पुनर्वसन केलं. त्यांच्या मुलीला म्हणजेच रोहिणी खडसे यांनाही पक्षातील महत्वाचं पद दिलं. भाजपात जाण्याचा विचार आपण सोडून दिल्याचे खडसे अनेकदा सांगत असले तरी मात्र भाजपात जाण्याची त्यांची मनिषा व धडपड दोन्ही कधी लपून राहिल्या नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.