यावल : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झालीत तरी महामंडळे स्थापन झाली नाहीत. जिल्ह्यात काँग्रेस टिकवून ठेवायची असेल तर, कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत. सत्ता असताना सत्तेची ताकद आम्हाला मिळणार नसेल तर काय काँग्रेस मेल्यावर ताकद देणार आहात का? असा सवाल आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Choudhary) यांनी काँग्रेस पक्षनिरीक्षकांना उपस्थित करून सरकारला घरचा आहेर दिला.
काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसतर्फे येथे खरेदी-विक्री संघाच्या आवारात झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार होते.
आमदार चौधरी म्हणाले, की मी माझे घर जाळून काँग्रेससाठी काम करतोय. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेश स्तरावर पोहोचविण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाकडून अपेक्षा करणे गैर नाही. पैसा आणि सत्ता ही आजची साधने आहेत. केवळ पक्षाच्या भरोशावर कामे होत नसतात. आमच्याकडे तोफ आहे, तुमच्याकडे दारूगोळा आहे. तुम्ही दारूगोळा दिला नाही तरी यावल- रावेर मतदारसंघात काँग्रेससाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. काँग्रेससाठीच झटणार आणि मरणार आहे. मेलो तरी अखेरपर्यंत काँग्रेस सोडणार नाही.
जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, की आतापर्यंत कोणीही जिल्ह्यास ताकद दिली नाही. सत्तेचा वाटेकरी जळगाव जिल्हा देखील असावा. माजी मंत्री (कै.) जे. टी. महाजन व (कै.) बाळासाहेब चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, आमदार चौधरी यांनी यावल -रावेर तालुक्यातील मातीत काँग्रेसचे बीज रुजवले आहे. काँग्रेसकडे त्यागाचा, बलिदानाचा इतिहास आहे. हीच खरी आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कार्यकर्त्यांमध्ये रुसवे-फुगवे होत असतात. बायकोची मर्जी जितकी जपावी लागते, तिच्यापेक्षाही जास्त कार्यकर्त्यांची मर्जी जपावी लागते, असे श्री.पवार यांनी सांगताच उपस्थितांत हंशा पिकला.
यावेळी पक्षनिरीक्षक दीप चव्हाण, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हितेश पाटील, मोहम्मद मुन्नवर खान, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, भगतसिंग पाटील, नितीन चौधरी आदी उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.