

Women Reservation Bill rejected : जनगणना न करताच लोकसभा मतदारसंघांची फेररचना करून, महिलांना आरक्षण देणारे घटनादुरूस्ती विधेयक विरोधी पक्षांच्या अखेरपर्यंत टिकलेल्या एकजुटीमुळे शुक्रवारी फेटाळले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच घटनादुरुस्ती विधेयक मतविभागणीनंतर पत्त्यासारखे कोसळले. महिला आरक्षण देणारे विधेयक मंजूर न झाल्याने महिलांना आरक्षणासाठी भविष्यात आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यातच नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी महिला आरक्षण नामंजूर झालेल्या प्रक्रियेवर समाज माध्यमांवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आमदार तांबेंनी अप्रत्यक्षपणे महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून काँग्रेसला जबाबदार धरल्याचे दिसते आहे.
आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी 'एक्स'वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आजचा दिवस दुःखद आहे, कारण महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाले. या धक्क्यानंतरही, भारत महिलांच्या हक्कांच्या बाबतीत सर्वात प्रगतिशील राष्ट्रांपैकी एक आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेत महिलांना मतदानाच्या हक्कासाठी अनेक दशके लढा द्यावा लागला. पण भारतीय महिलांना सुरुवातीपासूनच मतदानाचा हक्क होता. हा पराभव भारतीय महिलांसाठी एक मोठा धक्का आहे. परंतु संविधानाची समानतेची भावना आपल्याला पुढेही मार्गदर्शन करत राहील."
आमदार तांबेंनी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सूचक भाष्य केलं आहे. महिला (Women) विधेयक नामंजूर होण्यावर नाराजी व्यक्त करताना, अमेरिकेतल्या महिलांना हक्क मिळवण्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण करून दिली. अमेरिकेतल्या महिला लढ्याची आठवण करून देण्याच्या आमदार तांबेंच्या सूचक भाष्याचे अनेक अर्थ निघत आहेत अन् लावले जात आहेत. हा इशारा सत्ताधाऱ्यांना आहे की, विरोधकांना? विशेष करून काँग्रेसला तर नाही ना? असे विश्लेषक चर्चा करत आहेत.
सत्यजीत तांबे नाशिक पदवीधर निवडणुकीपासून काँग्रेस, महाविकास आघाडीपासून दूर झाल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत ते सक्रिय नव्हते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा, मामा बाळासाहेब थोरातांसाठी त्यांनी काम केलं. थोरातांचा पराभव झाल्यानंतर, ते आता संगमनेर मतदारसंघात प्रचंड सक्रिय झाले आहेत.
संगमनेर नगरपालिका निवडणुकीची सर्व सूत्र हाती घेताना, नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचं चिन्ह घेऊन निवडणुकीला समोरे गेले. त्यात त्यांनी घवघवीत यश मिळवलं. तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीसंदर्भात केलेल्या विधानामुळे ते चर्चेच्या, टिकेच्या केंद्रस्थानी आले.
संगमनेरच्या राजकारणात सक्रिय होताना, स्थिर होत असतानाच, आमदार तांबे सत्ताधारी भाजपच्या, विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले आहेत. 'गुडबुक'मध्ये गेलेत. गेल्या काही दिवसांतील आमदार तांबेंच्या राजकीय हालचाली पहिल्यास, ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खूपच जवळ गेल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची महिला विधेयकांवर केलेली पोस्ट विरोधकांना, काँग्रेसला सर्वाधिक सुनावणारी असल्याचा अंदाज आहे.
या पोस्टमध्ये सत्यजीत तांबे यांनी विरोधकांचे किंवा काँग्रेसचे थेट नाव न घेतल्यामुळे, सूचक भाष्य केलं आहे. ही खबरदारी घेताना, आमदार तांबे यांनी विरोधकांना अन् काँग्रेसला बोलण्याची संधी देखील दिलेली नाही. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील, अशीच सूचक पोस्ट 'एक्स'वर शेअर केली आहे. त्यांच्याही पोस्टमधून नाराजी झळकते. चतुर्वेदी अन् तांबे यांची पोस्ट सत्ताधाऱ्यांनाच अधिक फेव्हर करताना दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.