

बिजवडी: वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप करत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २० जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे राज्यभरात राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातून या यादीत समाविष्ट झालेले एकमेव नाव म्हणजे बिजवडी ता. माण येथील अक्षय महाराज भोसले यांचे आहे. त्यामुळे साताऱ्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
अक्षय महाराज भोसले हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार व संत साहित्य अभ्यासक आहेत. शिवसेना पक्षातील एक प्रमुख युवा नेते असून ते शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ते आहेत. ते वारकरी संप्रदायाशी निगडीत कार्यात सक्रिय असून विविध धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांद्वारे त्यांनी राज्यभर ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांनी ‘भक्ती शक्ती संगम यात्रा’सारखे राज्यव्यापी उपक्रम राबवून वारकरी व आध्यात्मिक क्षेत्रात मोठा प्रभाव निर्माण केला आहे. अनेक धार्मिक संघटनांशी समन्वय साधत ते समाजकार्य आणि अध्यात्मिक जागृतीसाठी कार्यरत आहेत.
वारकरी दिंडीस प्रथमच वारी काळात अनुदान देण्याचे काम अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वात झाले. सदर मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर करून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मोठ्या प्रमाणात कीर्तनाच्या माध्यमातून युवकांमध्ये प्रभाव असणाऱ्यांपैकी एक म्हणून भोसले यांची ओळख आहे.
ते वारकरी संप्रदायाचे मुखपत्र वैष्णव दर्शन चे मुख्य संपादक असून राज्यासह देश विदेशात त्यांचे बालसंस्कार वर्ग प्रभावीपणे चालतात. वारकरी सेवा रथ माध्यमातून वारीच्या मार्गावर अनेक वर्षांपासून ते सेवा कार्य करत आहेत. कोरोना काळातील त्यांचे कार्य आजही जिल्ह्यात विशेषत्वाने स्मरणात ठेवले जाते. निःस्वार्थ कीर्तन करणारे कीर्तनकार म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान, या यादीमागील निकष, पुरावे आणि उद्देश याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही वारकरी नेत्यांनी ही यादी राजकीय हेतूने प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अद्याप या संदर्भात अक्षय महाराज भोसले यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे वारकरी संप्रदायात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत या विषयावर अधिक घडामोडी होण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.