नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी (modi) अखेर प्रसारमाध्यमांसमोर प्रकट झाला. त्याने आपल्या मोदी का म्हणतात, यापासून आपणही पटोलेंना शिव्या देऊ शकतो, असे सांगितले. माझी पत्नी मला सोडून गेली, त्यानंतर मी गावी राहायला गेलो, त्या ठिकाणी मी एकटाच राहतो, त्यामुळे मला २०२० पासून गावातील लोक मोदी म्हणतात. मला माझ्या नावाने नव्हे; तर मोदी या नावानेच गावातील सर्वजण ओळखतात. हे माझ्या गावात जाऊन तुम्ही विचारू शकता. दारुच्या नशेत मी कुणालाही मारझोड करतो, मला सर्वजण घाबरतात, त्यामुळे मला गावगुंड असे संबोधतात, असेही उमेश घरडे ऊर्फ गावगुंड मोदी याने सांगितले. (After my wife left me, people started calling me Modi : Umesh Gharde)
जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या आदल्या दिवशी नाना पटोले यांनी नागरिकांशी बोलताना मी मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदीला मारू शकतो, असे विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात एकच राजकीय वाद उठला आहे. भाजपकडून पटोले यांच्यावर खरपूस शब्दांत टीका करण्यात येत आहे. त्यानंतर पटोले यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नव्हतो तर गावगुंड मोदीबद्दल म्हणालो होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. तेव्हापासून या गावगुंड मोदीबद्दल सर्वांना उत्सुकता होती.
भाजपवाले म्हणतात की तुम्हाला कुणीतरी उभे केले आहे. त्यावर उमेश घरडे ऊर्फ गावगुंड मोदी म्हणाला की, ‘मला कोणीही उभे केलेले नाही. मी स्वतःहून मीडियासमोर येऊन बोलत आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता मी हे सांगत आहे. पटोलेंची क्लिप बाहेर आल्यानंतर तुम्ही गायब होता, त्यावर तो म्हणाला की, माझ्याकडे एकदम दहा ते पंधरा लोक आल्यावर मी तर काय करणार. मी एकटाच राहतो. माझे काही कमी जास्त झाल्यावर काय करणार. हा गुंडच होता, म्हणूनच त्याला मारला, असाच विचार लोक करणार ना, असा सवालही त्याने केला.
पटोलेंसारख्या मोठ्या नेत्याने मारतो म्हटल्यावर तुम्हाला भीती वाटली नाही का, यावर उमेश घरडे म्हणाला की, मला कशाला भीती वाटेल. कारण ज्याअर्थी ते मला बोलू शकतात, त्याअर्थी मीही त्यांना दारुच्या नशेत बोलू शकतो. नाना पटोले कितीही मोठे नेते असले तरी मी त्यांना का घाबरू. ज्या पद्धतीने ते आपल्याला बोलू शकतात, शिव्या देऊ शकतात. त्याचपद्धतीने आपणही पटोलेंना शिव्या देऊ शकतो. पटोलेंना शिव्या दिल्यामुळे त्यांना भेटून त्यांची मी माफी मागणार आहे. त्यांना सांगणार आहे की, दारूच्या नशेत मी शिव्या दिल्या, मला माफ करा. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, तरी मी त्यांची माफी मागेन, असेही गावगुंड मोदी म्हणाला.
यापुढे मी गावाला जाऊन राहणार आहे. मी काही मोठा गुन्हेगार नाही. मी दारूची भट्टी लावायचो, दारू सप्लाय करायचो. तसेच, दारू पिऊन शिवीगाळ आणि मारझोड करायचो, त्यामुळे लोक घाबरून मला गुंडा म्हणायचे. मोदी म्हणूनही चिडवायचे, असेही उमेश घरडे याने स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.