NCP news live : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद सुरू झाला आणि पक्षाचे अकोला जिल्ह्यातही दोन गट पडले. आमदार व महानगराध्यक्षांचा एक गट तर जिल्हाध्यक्षांसह ज्येष्ठ नेत्यांचा दुसरा गट. दोन गट झाल्यामुळे आदेश कुणाचा मानावा, या संभ्रमात कार्यकर्ते सापडले आहेत. (Activists have found themselves in this confusion)
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा आदेश दुपारी काढला. त्यानंतर सायंकाळपर्यंत आदेश काढणारे जयंत पाटील यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आता आदेश कुणाचा मानावा असा प्रश्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे.
राज्याने राजकारणात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद वर्षभरापूर्वी अनुभवला. वर्षभर त्यावर मंथन चालले. हा वाद अद्याप सुरू असतानाच आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि त्यातही पवार विरुद्ध पवार असाच वाद अनुभवायला मिळत आहे. या वादाचे पडसाद आता अकोला शहरापर्यंत पोहोचले आहे.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांचे उघड समर्थन करणारे अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले असल्याचा आदेश जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने सोमवारी (ता. ३) दुपारी काढला. हा आदेश सोशल माध्यमांवरून व्हायरलही झाला. त्याची लेखी प्रत अकोल्यात पोहोचण्यापूर्वीच अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
सायंकाळी ही नवीन कार्यकारिणी जाहीर करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पदावरून दूर करीत खासदार सुनील तटकरे यांना नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर करण्यात आले. सोबतच जयंत पाटील यांना निलंबित करण्यात येत असल्याचे खुद्द अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे जयंत पाटील यांनी काढलेला आदेश मानावा की नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
अजितदादांच्या ‘टीम’मध्ये अकोल्याला स्थान..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करीत नवीन कार्यकारिणी जाहीर केली. खासदार सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष जाहीर केले. त्यांच्या नवीन ‘टीम’मध्ये अकोल्यालाही स्थान मिळाले आहे. अजितदादांचे निकटवर्तीय विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांना प्रदेश प्रवक्तेपदावर नियुक्त करण्यात आले आहे.
प्रशासकीय कामात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना तोड नाही. कार्यकर्त्यांची कामे करताना मनात किंचितही किंतू परंतू न ठेवता काम करणारे, अशी अजितदादांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ओळख आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेताच सर्व सामान्य कार्यकर्त्यांनाही आता लोकांची कामे करून घेता येतील, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे चालत्या गाडीत चढा, अशीच काहीशी भावना अकोला (Akola) शहरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये या सर्व राजकीय (Political) घडामोडीत दिसून आली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.