latest news Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाचा जो विकास झाला, ते बघून अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.(Will always support us to develop the country under the leadership of Modi)
आज (ता. ३) नागपुरात आले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राला तीव्रतेने पुढे नेलं पाहिजे, या भावनेतून अजित पवार आणि त्यांचे सहकारी सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्र घडवण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला सदैव साथ देतील.
एक मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटपाचे काय, असे विचारले असता, खातेवाटपाबद्दल मुख्यमंत्री बोलतील. तो अधिकार त्यांचा आहे, असे ते म्हणाले. शरद पवार काय म्हणतात, त्याबद्दल बोलणार नाही. मात्र राजकारणात बेरजेला महत्त्व आहे. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा अनुभव, देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव अजित पवार यांचा अनुभव या सरकारला महाराष्ट्राच्या विकासात कामी येईल, असे बावनकुळे म्हणाले.
मोदींचा विचार जगाने स्वीकारला आहे. राज्यात आणि देशात अनेक लोक त्यांच्यासोबत येण्यासाठी तयार आहेत. २०२४ पर्यंत आणखी मोठ्या लोकांचा पाठिंबा मिळताना दिसेल. शिंदे यांच्या नेतृत्वातले आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सर्व आमदार आमच्याकडे का आले आहे, हे संबंधितांनी समजून घेतलं पाहिजे. मंत्रिपदासाठी ते समोर आलेले नाहीत, तर हिंदुत्वाचा विचार येथे महत्त्वाचा आहे, असे बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासाचा विचार महत्त्वाचा आहे. जे आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांचा विचार मोदींच्या नेतृत्वात भारत घडवण्याचा आहे. देशहिताचा विचार करून कॉम्प्रमाइज करावे लागते. मंत्रिपद मिळाले की नाही, यापेक्षा देशहित महत्त्वाचा आहे. आमचे नेते, कार्यकर्ते किंवा आमदार मंत्रिपदासाठी काम करत नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांच्यासोबत आलेले सर्व आमदार सरकारमध्ये योग्य पद्धतीने काम करत आहेत. एकनाथ शिंदे जे ठरवतील तेच होणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.
शरद पवार यापूर्वीही रस्त्यावर उतरले आहेत. हा जो खेळ सुरू झाला तो शरद पवार यांनी सुरू केला. २०१९ मध्ये फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून सुरुवात कोणी केली. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून शरद पवार यांनी अनेक युक्त्या केल्या. आज जे पेरलं तेच उगवलं आहे.
भाजपने कुठलाही ऑपरेशन लोटस केलेलं नाही. आम्हाला त्याची गरजच पडली नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आले, ते उद्धव ठाकरे यांना कंटाळून आले. तर अजित पवार यांच्यासोबत जे आले ते मोदींच्या नऊ वर्षांचे कामकाज पाहून आले आहे. ते देशासाठी आले आहेत.
आम्ही कोणतीही फोडाफोडी केली नाही. आमचे संस्कार घर फोडण्याचे नाही. भाजपने (BJP) कुणाचे घर फोडलेले नाही. भाजपचे संस्कार जोडण्याचे आहे. चांगलं सरकार बनलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मर्द नेता मुख्यमंत्री आहे. सोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सारखे नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आता दुप्पट नाही तर तिप्पट वेगाने प्रगती करेल, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.