
Akola District Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार गटाच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद मोठी आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात अजित पवार गटानेही स्वतंत्रपणे पक्षवाढीसाठी जोर लावण्याचे ठरविलेले दिसत आहे. (Sharad Pawar group has more strength in Akola district than Ajit Pawar group)
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
जिल्ह्यात ठिकठिकाणी आमदार अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेश सोहळे घेण्यात येत आहेत. नुकताच बार्शीटाकळी येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश घेतला. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वेगवान घडामोडी होत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट झाल्यानंतर एक गट ‘साहेब’ यांचा, तर दुसरा ‘दादा’ यांचा गट म्हणून ओळखला जातो. जेथे जेथे ‘दादा’ गट सरसावतो तेथे ‘साहेब’ गट ॲक्टिव्ह होतो, तर कुठे कुठे ‘साहेबा’ची सभा आधी, तर नंतर ‘दादां’ची सभा होते. अकोल्यातही शरद पवारांच्या नंतर अजित पवारांची सभा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात शरद पवार व अजित पवार गट हे वेगवेगळे झाले असून, अजित पवार गटाने आता राज्यात पक्षसंघटनेवाढीसाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजित पवार गटाचे नेते कार्यकर्त्यांशी संवाद, मतदारांशी संवाद, शासनाच्या योजनांचा प्रचार, प्रसार व पक्षसंघटना वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात आले.
अकोला जिल्ह्यात अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष(ग्रामीण) कृष्णा अंधारे, जिल्हाध्यक्ष (शहर) विजय देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात 'अजितपर्व' आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची मोठी ताकद आहे. अनेक जुने नेते शरद पवार गटात आहेत. सहकार क्षेत्रातील अनेक नेतेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.
भविष्यात हे दोन्ही गट एकमेकांविरोधात लढल्यास अजित पवार गटाला पक्ष वाढविण्यासाठी आपली ताकद जिल्ह्यात वाढवावी लागणार आहे. त्यासाठी या गटाच्या वतीने जिल्ह्यात पक्ष कार्यकर्ता जुळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये या गटाला किती यश येते, हे येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे. मात्र, अजित पवार गटाला जिल्ह्यात वाढण्यासाठी मोठा कस लागणार आहे.
शरद पवार १२ ऑक्टोबरला अकोल्यात..
शरद पवार गटाचा ऑक्टोबरमध्ये विदर्भ दौरा असून, या दौऱ्यात आगामी निवडणुका पाहता पक्ष संघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. शरद पवार १२ ॲाक्टोबरला अकोला जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याच वेळी ते पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या या दौऱ्याचा फायदा निश्चितच पक्षाला होणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.