

Akola Gutkha Factory FDA Raid : अकोल्यातील बनावट गुटखा प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील दोन अवैध गुटखा उत्पादन कारखान्यांवर संयुक्त कारवाई केली.
या कारवाईत सुमारे 50 लाख रुपयांचा तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल, पॅकिंग साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या एका गोदामाचा संबंध अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता अभिषेक गई यांच्याशी असल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक गई हे भाजपचे (BJP) माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विनोद मापारी यांचे भाचे असल्याची माहिती समोर आल्यानंतर या कारवाईची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
प्राथमिक तपासानुसार, या अवैध गुटखा रॅकेटचा मुख्य सूत्रधार गौरव शर्मा असल्याचा संशय आहे. कारवाईपूर्वीच तो फरार झाल्याची माहिती असून पोलिसांकडून (Police) त्याचा शोध सुरू आहे. त्याच्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात संघटित गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता मकोका (MCOCA) लागू करण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारवाईदरम्यान संबंधित कारखान्यात 'विमल', 'वाह', 'रेड लेबल' आणि 'बहार' या नावांनी बनावट गुटखा आणि पान मसाल्याची निर्मिती व पॅकिंग होत असल्याचे तपासात उघड झाले. या उत्पादनांचा पुरवठा राज्यातील विविध भागांत होत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून, या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, अभिषेक गई यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनोद मापारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित गोदाम अधिकृतपणे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भाडेकरार करून देण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याचे उत्पादन सुरू असल्याची कोणतीही माहिती किंवा कल्पना नव्हती, असा दावा त्यांनी केला.
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईनंतर अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या रॅकेटमागील आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी आणि इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.