

Maharashtra Police Wildlife Smuggling : महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा डागाळणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात वाघांच्या कातडीची तस्करी करताना वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर गडचिरोलीमध्ये करण्यात आलेल्या पुढील छाप्यात आरोपींपैकी एकाच्या घरातून खवल्या मांजराचे (पँगोलिन) खवले जप्त करण्यात आले असून, हे दोघे मोठ्या आंतरराज्यीय वन्यजीव तस्करी रॅकेटचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाबूराव मडावी आणि बिजेश्वर गेडाम अशी असून, दोघेही महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील कांकेर जिल्ह्यातील पश्चिम भानुप्रतापपूर वनविभागाच्या बांदे परिसरात सोमवारी मध्यरात्री ही मोठी कारवाई करण्यात आली. दुचाकीवरून दोन वाघांची कातडी घेऊन जात असताना वन अधिकाऱ्यांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
ही कारवाई अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने राबवली. यात उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्पाचे शिकारविरोधी पथक, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB), राज्यस्तरीय फ्लाइंग स्क्वॉड आणि पश्चिम भानुप्रतापपूर वनविभाग यांचा समावेश होता. आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बिजेश्वर गेडामची चौकशी केल्यानंतर तपासाचे धागेदोरे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचले. अहेरी येथील त्याच्या घराची झडती घेतली असता, घरातून संरक्षित प्रजाती असलेल्या खवल्या मांजराचे (पँगोलिन) खवले जप्त करण्यात आले. यामुळे आरोपी केवळ वाघांच्या कातडीपुरते मर्यादित नसून विविध दुर्मिळ वन्यप्राण्यांच्या तस्करीशी संबंधित असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या दोन वाघांची शिकार बस्तरमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प आणि अबुझमाड जंगल परिसरात करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य शिकारी आणि संपूर्ण तस्करी साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे ही कारवाई ‘ऑपरेशन सेफ पॅसेज’ या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. महाराष्ट्रातील गडचिरोली, छत्तीसगडमधील इंद्रावती आणि उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प तसेच ओडिशातील सुनाबेडा अभयारण्य यांना जोडणाऱ्या सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या वन्यजीव कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी हे अभियान राबवले जात आहे.
महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे नाव अशा गंभीर वन्यजीव तस्करी प्रकरणात समोर आल्याने खळबळ उडाली असून, या रॅकेटचे आणखी मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.