

Amravati gram panchayat news : राज्यात गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या फक्त हालचाली सुरू आहे. स्थानिकच्या निवडणुकीचा मुहूर्त कधी लागणार, याकडे लक्ष असताना, अमरावती जिल्ह्यातील 557 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 15 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे.
या निवडणुका कधी होणार, याबाबत राज्य ग्रामपंचायत विभाग आणि निवडणूक आयोगाकडून कोणत्याही हालचाली नसल्याने, नेमकं काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील 557 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या 15 फेब्रुवारीस संपुष्टात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद व महापालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात ग्रामपंचायतींकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने 15 फेब्रुवारीनंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासक राजवट सुरू येण्याची चिन्हे आहेत.
2021 मध्ये निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये आठ सरपंच (Sarpanch) व 100च्या वर सदस्यांची पदे रिक्त आहेत. सोबतच 15 फेब्रुवारीला 557 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणे गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम लागणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांच्या लगबगीत असल्याने आयोगाला ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा विसर पडला आहे.
महिनाभरात ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागला नाही तर या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची राजवट लागू होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायतींपैकी 2021 मध्ये 557 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यात. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी सरपंच व सदस्यांच्या जागा काही कारणास्तव रिक्त झाल्या आहेत. सुमारे 100 सदस्य व आठ सरपंच पदे अद्यापही रिक्तच आहेत.
दीड वर्षापासून अचलपूर तालुक्यातील देवमाळी, वरुड तालुक्यातील जरुड आणि शहापूर या तीन ग्रामपंचायतीदेखील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या दीड वर्षात पोटनिवडणुकांसाठी अनेकदा कार्यक्रम लागला. पण विविध कारणांमुळे त्या वारंवार स्थगित झाल्या. एप्रिलमध्ये मतदारयादी जाहीर झाल्याने गावपुढाऱ्यांना निवडणुकीची प्रतीक्षा होती. मात्र, पुन्हा प्रक्रिया थांबवण्यात आली.
ग्रामपंचायतींचा कालावधी फेब्रुवारी 2026 मध्ये संपत आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागरचना व आरक्षण निश्चितीची प्रक्रिया याआधीच सुरू व्हायला हवी होती. मात्र शासन व निवडणूक आयोगाकडून कोणत्याच हालचाली नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.