
Nagpur News: काँग्रेसचे नेतेही काहीही बोलतात. हे त्यांचे संस्कारच आहे. त्यावर मी काही बोललो तर त्यांना वाईट वाटते, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळात केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेल्या तरतुदींची तुलनात्मक आकडेवारी सादर करून पुन्हा एकदा काँग्रेसवर शरसंधान साधले.
नागपूरमधील नॅशनल कँसर इस्टिट्यूटच्या स्वस्ती निवासचे भूमिपूजन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या भाषणात अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दहा वर्षांत देशात झालेल्या परिवर्तनाची माहिती दिली. कँसर संस्थेचा कार्यक्रम असल्याने त्यांनी केंद्राच्या बजेटमध्ये आरोग्य विभागावर केलेल्या बजेटचा आकडाच त्यांनी मांडला.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकारच्या अखेरच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी ३७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती वाढवून एक लाख ३५ हजार कोटी केली. भाजप सरकारने जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तब्बल एका लाख कोटींची त्यात भर टाकली.
एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. भाजपच्या ११ वर्षांत २३ एम्सला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्यापासून आपल्या देशात फक्त ११ एम्स होते. देशात २०१४ ला भाजप सरकार येईस्तोवर देशात ३८७ मेडिकल कॉलेज होते. ते आता ७८० झाले आहेत. एमबीबीएस डॉक्टरांची संख्या ५१ हजार होती. ती आता एक लाख १८ हजारांवर पोहचली आहे. पीजी डॉक्टर ३१ हजार होते, आता ७४ हजार आहेत, असे शाह म्हणाले.
काँग्रेसच्या काळात कँसर सारख्या दुर्धर आजावर उपचार करण्यास आपण कर्जबाजारी होऊ या भीतीने लोक घाबरत होते. लोकांची आर्थिक अडचण आणि होणारी कुचंबना लक्षात घेऊन मोदी सरकारने गोरगरिबांसाठी पाच लाखांचा आरोग्य विमा आणला. डबल इंजिन सरकार असलेल्या भाजपच्या राज्यांनी त्यात आणखी भर टाकून आरोग्य विमा १० लाख रुपये केला आहे. त्यामुळे देशातील सुमारे सात कोटी लोकांवर मोफत उपचाराची सोय भाजपने उपलब्ध करून दिली आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.
स्वस्त औषध दुकानांची साखळी देशभर उभारली आहे. या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या या उल्लेखनीय कामगिरीकडे अमित शहा यांनी लक्ष वेधले. सोबतच मी सांगितल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना खरे वाटणार नाही, ते विरोधात काही तरी टीकाटीपणी करणारच आहेत, ते त्यांचे संस्कारच असल्याचा टोलाही यावेळी शाह यांनी लागावला.