

Amravati Municipal Election : भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी, 'हिंदूंना चार मुलं जन्म घालावीत', असा सल्ला दिलो होता. यावर AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी, 'तुम्ही चार नाही, आठ मुलं करा, आम्हाला काय करायचं', असा टोला लगावला.
तसंच ओवैसी यांनी संघाच्या लव्ह जिहादावर, अजित पवारांच्या राजकीय भूमिकेवर देखील जोरदार हल्ला चढवला.
अमरावती महापालिका निवडणुकीत 'AIMIM'चे 28 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ ओवैसी यांची जाहीर सभा झाली. सभेपूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. तसंच प्रचार सभेत देखील विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या मुलांना जन्म घालण्याच्या विधानावर जोरदार प्रहार केला.
नवनीत राणा (Navneet Rana) यांनी, एका मौलानाचा दाखला देत, मला चार बायका आणि 19 मुलं आहेत, असे सांगून हिंदू व्यक्तींना, ते 19 मुलांना जन्म घालत असतील, तर आपण किमान चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, असे आवाहन करणारे विधान केलं होतं. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांवर पलटवार केला आहे. 'तुम्ही चार नाही, आठ मुलं करा, आम्हाला काय करायचं,' असा टोला लगावला.
'भारत हा तरुणांचा देश आहे आणि मोठ्या प्रमाणावर 40 वर्षांखालील तरुणांची संख्या आहे. त्यांना तुम्ही नोकऱ्या नाही देत आहे. RSS आणि मोदी म्हणतात की, आम्ही नोकऱ्या नाही देऊ शकत, तुम्ही गोरक्षक बना,' अशी देखील ओवैसी यांनी टिप्पणी केली.
असदुद्दीन ओवैसी यांनी अजित पवारांचाही देखील चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, “अजित पवारांकडे बोलण्यासाठी आता काही उरलेलं नाही. आधी त्यांनी राज्यासाठी काय केलं ते सांगा.” महाराष्ट्रातील मॉब लिंचिंगचा मुद्दा उपस्थित करत ओवैसींनी 2014मधील जळगाव येथील मोसिन शेख प्रकरणाचा उल्लेख केला आणि या प्रकरणात न्याय न मिळाल्याचा आरोप केला. “गुन्हा झाला, केस संपली. पण न्याय मिळाला नाही,” असे ते म्हणाले.
मात्र अमरावतीमध्ये इथले लोक म्हणतात “दादा बोलले, दादा बोलले, पण दादा कोण आहे हे माहिती आहे का?,” अशी टीका त्यांनी केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था, अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि न्याय या मुद्द्यांवर सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट जबाबदारी स्वीकारण्याचे आव्हान दिले.
''आरएसएस'ने लव्ह जिहादच्या नावावर धार्मिक वाद सुरू केला आहे. 18 वर्षांच्या युवतीला व 21 वर्षांच्या युवकाला कायद्याने सज्ञान ठरविले आहे. या वयोगटातील युवक व युवती वैचारिक पातळीवर सज्ञान असून ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. आरएसएसने लव्ह जिहादच्या नावावर धार्मिक ध्रुवीकरण सुरू केले असून, देशात किती प्रकरणे लव्ह जिहादची घडली आहेत, ती संख्या संसदेत मांडावी व लव्ह जिहादची नेमकी व्याख्या काय आहे, ते मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे,' असे आव्हान असदुद्दीन ओवैसी यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.