

'राणा विरुद्ध खोडके' हे अमरावतीच्या राजकारणातील पारंपारिक विरोधक. निवडणूक लोकसभेची असो की महापालिकेची असो, या दोघांमधील वाद ठरलेला. पण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर शहराचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेत आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचची मदत घ्यावी लागली आहे.
खोडकेंनी सुरुवातीला राणांच्या उपमहापौरपदाच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली होती. पण चंद्रशेखर बावनकुळेंमार्फत राणांनी खोडकेंना मदतीची विनंती केली, मनधरणी केली. अखेर खोडकेंनी राष्ट्रवादीची मते युवा स्वाभिमानच्या पारड्यात मते टाकली. या मदतीमुळे अमरावतीच्या राजकारणात आता रवी राणांचे नाक संजय खोडके यांच्या मुठीत आले आहे. त्यामुळे या पुढील काळात शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढलेली दिसून येणार आहे.
राणा विरूद्ध खोडके हा संघर्ष अमरावतीकरांसाठी नवा नाही. 2004 मध्ये संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके बडनेरा मतदारसंघातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. या काळात रवी राणा विरुद्ध खोडके या वादाच्या ठिणग्या पडल्या होत्या. पण 2009 रवी राणांनी अपक्ष उभे राहून खोडके यांचा पराभव केला. तिथंपासूनच या दोघांमधील वाद वाढत गेला. 2014 मध्ये खोडके दाम्पत्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नवनीत राणांनीही प्रवेश केला अन् त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली.
खोडके दाम्पत्याने राणा यांच्या उमेदवारीला उघड विरोध सुरु केला. हा विरोध त्यांच्या अंगलट आला अन् दोघांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाली. पर्यायी पक्ष म्हणून दोघांनी काँग्रेसचा स्वीकार केला. सुलभा खोडकेंनी 2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेसमधून लढली पण रवी राणांनी त्यांना दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला. 2019 मध्ये राजकारण कमालीचे बदलले. नवनीत राणांनी राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्याचवेळी सुलभा खोडकेंनी बडनेरा सोडून अमरावतीमधून निवडणूक लढली अन् विजयही मिळवला.
पण दोघांमधील वाद शांत झाला नव्हता. 2019 ते 2024 या काळात नवनीत राणा खासदार, तर रवी राणा आमदार होते. दोघांनीही जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवली होती. 2024 च्या निवडणुकीत नवनीत राणा भाजपच्या उमेदवार होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये होती. पण खोडके यांनी नवनीत राणांना आपला फोटो वापरण्यास जाहीरपणे बंदी केली होती. खोडके यांनी महायुतीत असूनही प्रहारच्या उमेदवाराचे काम केल्याचे राणा यांच्या गटाचे म्हणणे होते.
महायुतीतील या बेबनावामुळे नवनीत राणा यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. या पराभवाचा सूड म्हणून राणा गटाने अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता यांना बळ दिल्याचे म्हटले गेले. आताही महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार नाहीत, हे उघड होते. निवडणुकीनंतरही राणा आणि खोडके यांच्यात मतैक्य होणे अशक्य मानले जात होते. पण बावनकुळे यांच्या मध्यस्थीनंतर खोडके गटाने राणांच्या गटाला मदतीची भूमिका घेतली.
आता या बदल्यात खोडके यांनी कोणती गोष्ट पदरात पाडून घेतली आहे हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. पण अमरावती महापालिकेत सध्या काँग्रेसच्याही जागा निर्णायक आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे सत्ता टिकवायची असल्यास राणा दाम्पत्याला खोडकेंना दुखवून चालणार नाही. त्यामुळे बार्गेनिंग पॉवर वाढलेल्या राष्ट्रवादीच्या आणि खोडकेंच्या हातात राणांचं नाक आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे बशीर बद्र म्हणतात त्याप्रमाणे "दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.