Grampanchayat Election Results Analysis : जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल हाती आला. ही निवडणूक पक्षाच्या स्तरावर लढल्या जात नसली तरी आगामी निवडणुकींच्या दृष्टीने जिल्ह्यातील राजकीय दिशा ठरविणारा कौल मतदारांनी दिला आहे. एकीकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने ग्रामीण भागातील मतदारांवरील पकड आणखी घट्ट केली असून, भाजपने शिवसेनेत फुट पाडून ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी आगामी वाटचाल अधिकच आव्हानात्मक ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही जिल्ह्यात अस्तित्व शोधताना दिसते आहे.
अकोला (Akola) जिल्ह्यातील राजकारण हे ग्रामीण आणि शहरी असे दोन भागात विभागल्या गेले आहे. वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) ग्रामीण भागात पकड असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था गेले २५ वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. त्यातुलनेत भाजपचे वर्चस्व शहरात अधिक राहिले आहे. सन २०१९ पर्यंत भाजपला (BJP) ग्रामीण भागात शिवसेनेच्या रुपाने चेहरा सोबती होता. आता मात्र त्याच शिवसेनेत फुट पडल्याने भाजपला ग्रामीण भागात मुसंडी मारता आली. शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही निवडणूक आरसा दाखविणारी ठरली आहे. ज्या ग्रामीण मतदारांच्या बळावर शिवसेनेचे (Shivsena) आव्हान होते, ते बळच कमी होताना दिसत असल्याने शिवसेनेचे पुढची वाट चांगलीच खडतर राहणार आहे. शिवसेनेतून वेगळे होत स्वतंत्र चूल मांडणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) ग्रामीण भागात पाय रोवण्यात अपयशी ठरली. मतदारांनी शिवसेनेला पर्याय म्हणून मनसेला साथ दिल्याचे चित्र कुठेही जिल्ह्यात बघावयास मिळाले नाही. मात्र, दोन ठिकाणी मनसेने बाजी मारत जिल्ह्यात आपले नाव ग्रामीण भागात नोंदविले.
मतदार टिकविण्याचे वंचितपुढे आव्हान..
ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीने आपली पकड मजबूत केली आहे. पक्षाचा परंपरागत मतदार जोडून ठेवण्यात यश आले आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत हा मतदार कायम टिकवून ठेवण्याचे आव्हान वंचितपुढे राहणार आहे. यापूर्वीचा इतिहास बघता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भरभरून मतदान करणारा मतदार विधानसभा आणि लोकसभेत वंचितसोबत टिकून राहत नाही. ही परंपरा मोडीत काढण्यासाठी सत्तेचा उपयोग करून मतदार टिकविण्याचे प्रयत्न वंचित बहुजन आघाडीला करावे लागणार आहे.
शिवसेनेची वाट खडतर..
वंचित बहुजन आघाडीचे यश आणि भाजपची ग्रामीण भागातील मुसंडी बघता ठाकरे आणि शिंदे गटात विभागलेल्या शिवसेनेची वाट यापुढेही खडतर राहणार हे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागाचा चेहरा असलेल्या शिवसेनेच्या मतदारांना राज्यपातळीवरील सुरू असलेल्या काही घडामोडी रूजलेल्या दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेने सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
भाजपला कुरघोडीचे राजकारण करावे लागणार..
आतापर्यंत शहरी चेहरा असलेल्या भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण मतदारांनीही भरभरून मतदान केल्याचे बघावयास मिळाले. त्यामुळे आता राज्यातील सत्तेचा उपयोग करून निधीची लालसा देत ग्रामीण भागातील पकड अधिक घट्ट करण्याची संधी आहे. जेथे निधीची लालसा कामी येणार नाही तेथे फोडाफोडीचे राजकारण करून भाजपला कुरघोडी करावी लागणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी कारणे शोधण्यात व्यस्त..
अकोला जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चाच ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झाली नाही. त्यामुळे साहजीकचे निकालानंतर या दोन्ही पक्षांसाठीचे चित्र फारसे धक्कादायक नव्हते. आता दोन्ही काँग्रेस कारणे शोधण्यात व्यस्त आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.