नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपने कटकारस्थाने रचून जेलमध्ये टाकले. पण यातून त्यांच्या हाती काहीच लागणार नाही, तर अनिल देशमुख लवकरच तुरुंगातून बाहेर येतील आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.
भाजपची कारस्थाने एव्हाना सर्व जनतेला कळून चुकली आहे. चांदीवाल आयोगासमोर स्पष्टीकरण देताना सचिन वाझे कसा सरड्याप्रमाणे रंग बदलतो, हेसुद्धा सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. परमबीर सिंह सारखा करप्टेड माणूस अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आयटीच्या धाडी टाका किंवा ईडीच्या. त्यातून साध्य काहीच होणार नाही. अनिल देशमुख लवकरच परत आलेले दिसतील आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही दिसतील, असेही मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले.
तानाजींना पक्षप्रमुख समज देतील..
गेल्या आठवड्यात नागपूर दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, त्यांचा राजीनामा घेण्यात जरा घाईच झाली, ते खरे आहे. एका निष्कलंक नेत्याच्या विरोधात भाजपने कारस्थाने रचली आहेत. त्यांनाही लवकरच उत्तर मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या घरापर्यंत जर भारतीय जनता पक्षाचे लोक जाण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्यांनाही माहिती आहे की, महाराष्ट्र शाबूत ठेवायचा असेल, वाचवायचा असेल तर भाजपला महाराष्ट्रापासून दूर ठेवले पाहिजे. त्यामुळे तानाजी सावंत यांना त्यांचे पक्षप्रमुख योग्य वेळी योग्य समज देतील, असे त्यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत बोलताना सांगितले.
एक तानाजी सावंत बोलले म्हणजे ते काही त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाचं मत होत नाही. त्यांच्या पक्षाचे आमदार सुनील बांगर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते, की उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांना ७५० कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे एखादा आमदार बोलत असेल आणि ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, असे वाटत नाही. त्यांची नेमकी काय घालमेल झाली, हे माहिती नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये सर्व ऑलवेल आहे. तानाजी सावंत यांच्यासारखे कुणी काही बोलत असतील, तर उद्धव ठाकरे त्याला फारसे गांभीर्याने घेणार नाही, असे आमदार मिटकरी म्हणाले.
आग सदाभाऊंच्या बुडाखाली लागली..
सदाभाऊंची आमदारकीची टर्म आता संपलेली आहे. महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहे, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत आणि त्यांना पुढे आमदारकी पाहिजे आहे. त्यासाठी त्यांचे हातपाय मारणे सुरू आहे. खरं तर शरद पवार यांच्यासारख्या महासूर्याबाबत बोलताना त्यांनी भान ठेवायला पाहिजे. सूर्याकडे बघून थुंकल्यावर काय होते, हे त्या कळत असावे. खरं तर त्यांच्याच बुडाखाली आग लागली असावी. त्यामुळे त्यांच्या तोंडून काही बाही वक्तव्य बाहेर पडत आहे, असे आमदार मिटकरी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मास्टरमाईंड..
सदाभाऊंना पुढेही त्यांची आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचे मित्र हे सर्व स्वतःहून करत नाहीत, तर त्यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस आहेत, असे स्पष्ट मत मिटकरींनी व्यक्त केले. मुळात भारतीय जनता पक्षाचं काम आग लावण्याचं आहे. त्यांची पार्टी ते काम करते आणि ही लोक दुसऱ्यांबद्दल बोलत सुटतात. आग कोण लावते, हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि सदाभाऊंच्या बोलण्याला त्यांच्याच पक्षात आता काही किंमत नाही. त्यांना एकदा मंत्रिपद मिळाले, एकदा आमदारकी मिळाली. आता त्यांची टर्म संपली आणि पुन्हा आमदारकी मिळावी, त्यासाठी त्यांची ही केविलवाणी धडपड आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना नेते यांचा नागपूर दौरा झाल्यानंतर तुम्ही नागपुरात आला याचे कारण विचारले असता, आमदार मिटकरी म्हणाले आजचा नागपूर दौरा आधीच ठरला होता. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मी येऊ शकलो नाही आणि अधिवेशन आटोपताच नागपूर आणि काटोलच्या दौऱ्यावर आलो. जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या जिल्हा परिषद मतदार संघातील काही कामांचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी आलो असल्याचे आमदार मिटकरी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.