Gondia News : सरकारी कार्यालयांमध्ये नेमके चालते काय, हा सामान्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो. बऱ्याचदा तर आलेला पैसा खर्च करावा लागतो म्हणून पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्यावतीने 28 व 29 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील अदासी येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या पशुपक्षी प्रदर्शनाकडे पशुपालकांनीच पाठ फिरविली. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा हा फटका मानला जात आहे. पशुपक्षी प्रदर्शनीकडे पशुपालकांनी पाठ फिरविल्याने प्रशासनाचा मोठा निधी वाया गेल्याचे बोलले जात आहे.
पशुपक्षी प्रदर्शनीत उभारलेल्या मंडपात जवळपासच 250 पशुपक्षींची नोंद होती. तालुकास्तरावरील पशुपक्षी प्रदर्शनाचा आढावा घेतल्यास 500 पेक्षा अधिक पशुपक्षींची संख्या असताना गोंदिया जिल्हास्तरावरील आयोजनाला ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. या प्रदर्शनात मोजक्याच 15 ते 20 गटात आलेल्या पशुपक्षींची पाहणी करुन निवड करण्याची वेळ प्रशासनावर आली. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आभासी पद्धतीने केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगांथम होते. पशुसंवर्धन व कृषी सभापती रुपेश कुथे, गोंदिया पंचायत समिती सभापती मुनेश रहागंडाले, तिरोडा पंचायत समिती सभापती कुंता पटले, जिल्हा परिषद सदस्य आनंदा वाढिवा, तांडा व अदासी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह इतर मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. गोंदियात जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील पशुपालकांच्या उत्कृष्ट जनावरांचा देखावा व पुरस्कार, पशुसंवर्धन विभागामार्फत विविध तांत्रिक बाबींचे ‘मॉडेल्स’व्दारे प्रदर्शन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी वैशिष्ट्य राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.
पशुपक्षी प्रदर्शनीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे अर्जुनी मोरगाव, देवरी, सालेकसासारख्या तालुक्यातील पशुपालक आपले पशुपक्षी याठिकाणी घेऊनच आले नाहीत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जे पशुपालक उपस्थित झालेत, त्यांचीही मोठी गैरसोय झाल्याचे अनेकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उद्घाटनच्या वेळेपर्यंतही भोजन, फराळाची सुविधा नव्हती. एकंदरीत जिल्हा निधीची तरतूद कामी लावण्यासाठीच हे आयोजन केल्याचेही बोलले जात आहे. हा प्रकार लक्षात घेता शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याची टीका होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.