Nagpur News : विदर्भातील नागपूरमध्ये गुरुवारपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विदर्भात होणाऱ्या या अधिवेशनात विदर्भातीलच प्रश्न प्रलंबित राहतात. सत्ताधारी सध्या खेळखंडोबा करीत आहेत. दोन महिन्यांचे अधिवेशन नागपुरात घ्यायला पाहिजे, त्याशिवाय विदर्भाचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी टीका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली.
विदर्भातील अधिवेशन जास्तीत जास्त कालावधीसाठी असायला पाहिजे, अशी मागणी करणारे सत्तेत आल्यानंतर 10 दिवसांचे कामकाज ठेवतात. विदर्भाच्या विषयावर सत्ताधारी केवळ टाइमपास करीत आहेत. सत्ताधाऱ्यांना विदर्भातील गंभीर समस्यांबाबत काहीही देणं घेणं नाही, अशी टीका आमदार ठाकूर यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारला लोकांच्या कामांमध्ये काहीही रस नाही. विदर्भातील अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न प्रलंबित आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे.
अशा परिस्थितीत सरकारने प्रदीर्घ अधिवेशन घेत विदर्भातील प्रश्नांवर तोडगा काढायला पाहिजे होता. परंतु सरकारला केवळ सत्तेमध्ये रस आहे. सामान्यांच्या प्रश्नांपासून पळवाट शोधण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी घटवल्याची टीका करत आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धारेवर धरलं.
आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा. त्यानंतरही सरकार याबाबत गांभीर्याने निर्णय घेईनासे झाले आहे. सरकारला विरोधी पक्षाचे आमदार आपल्याला धारेवर धरतील याची भीती आहे. त्यामुळे सरकारने अधिवेशनाचे दिवस अत्यंत कमी ठेवले आहेत.
कागदोपत्री जरी अधिवेशन दोन आठवड्यांचे असेल तरी प्रत्यक्ष कामकाज 10 होणार आहे. अशातही गोंधळ आणि धिंगाणा करत सरकार सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. दोन्ही सभागृह सातत्याने तहकूब होत राहिल्यास विदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीत राहण्याची भीती आहे, असं आमदार ठाकूर म्हणाल्या.
सरकारमधील अनेक मंत्री विदर्भाच्या समर्थक असल्याचा दावा करतात. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना विदर्भातील अधिवेशनाच्या मुद्द्यावर हेच नेते आक्रमक भूमिका घ्यायचे. सत्तेवर आल्यानंतर याच नेत्यांना आता काय झाले आहे, असा प्रश्नही आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. अधिवेशनाचा देखावा करायचा असेल तर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून काय उपयोग. अख्खं मंत्रिमंडळ आणि सचिवालय हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येत असते. या सर्व खर्चाला कोणाला जबाबदार धरणार, असा सवालही त्यांनी केला.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.