

Maratha Reservation News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा झाली. सर्व राज्याचे लक्ष या सभेकडे लागले होते. दरम्यान, या सभेवरून राज्यभरातून मत मतांतरे येऊ लागली आहेत. मराठा आरक्षणावरून सरकार थोडं पेचात पडलं आहे, पण लवकरच सकारात्मक निर्णय होऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार, असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. (The government will take a positive decision soon)
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या कार्यक्रमासाठी बच्चू कडू आज (ता. १४) भंडाऱ्यात दाखल झाले. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकार सुरुवातीपासून मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे की, स्वतंत्र आरक्षण द्यावे, याच पेचात सरकार आहे. लवकरच सकारात्मक निर्णय सरकार घेणार आहे.
विश्वास ठेवा सरकार लवकरच मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल, असे म्हणत आमदार कडूंनी अशी शिंदे - फडणवीस - पवार सरकारची पाठराखण केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले होते. वाढता पाठिंबा आणि राज्यभरातून आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी यामुळे जरांगे यांचे उपोषण सतरा दिवस चालले.
राज्य सरकारने या आंदोलनाचा चांगलाच धसका घेतला. राज्य सरकारच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ तीन-चार वेळा अंतरवालीत पाठवून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. मात्र, कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे आणि ओबीसी प्रवर्गाच्या सवलती मिळाव्यात, या मुद्द्यावर जरांगे आणि त्यांचे सहकारी ठाम राहिले. दरम्यान, कोंडी फुटत नसताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अंतरवाली गाठून जरांगेची समजूत काढली.
आंदोलन १७ दिवसांनी थांबवण्यात आले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे; तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीला घेऊन आज (ता. १४) मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत भव्य सभा घेतली. त्यामुळे पुन्हा जरांगे पाटलांनी सरकारला जेरीस आणले असल्याचे दिसून येत आहे. जरांगे यांच्या सभेवर संपूर्ण राजकीय पक्षांचे लक्ष होते. त्यानंतर राजकीय पक्षांकडून विविध प्रतिक्रिया समोर आल्या.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.