
Bhandara Political News : भंडारा जिल्ह्यातील स्फोटक राजकीय परिस्थितीकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. बीआरएस नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सध्या नवा वाद जिल्ह्यात रंगला आहे. (Charan Waghmare has targeted another MLA)
भंडारा जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या आशीर्वादाने घरफोडीच्या प्रकरणात वाढ झाली असून, गृह खात्याचे दुर्लक्ष आहे. स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहमंत्री असून, घरफोडी करणाऱ्या चोरांकडून पैसे घेऊन त्यांना मदत केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत, असा गंभीर आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी यापूर्वी केला होता.
या वादात चरण वाघमारे यांनी अजून एका आमदाराला टार्गेट केले आहे. ते दुसरे तिसरे कोणी नसून माजी आमदार चरण वाघमारे यांचे परंपरागत राजकीय वैरी असलेले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार राजू कारमोरे हे आहेत. चरण वाघमारे यांनी आमदार कारमोरे यांच्या विधानसभा क्षेत्रातील नागठाणा मत्स्यबीज केंद्रात दुरुस्तीच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी करत ८० लाख रुपयांचे कामे निकृष्ट केल्याचा आरोप केला आहे.
विशेष म्हणजे भंडारा सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदार यांच्यावर मेहेरबान असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. त्यामुळे माजी आमदार चरण वाघमारे व विद्यमान आमदार राजू कारमोरे या दोन नेत्यांमध्ये कडवटपणा निर्माण झाला आहे. आमदार राजू कारमोरे यांच्या विधानसभा क्षेत्रातील मोहाडी तालुक्यातील नागठाना येथे शासनाद्वारे मत्सबीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. हे मस्त्य बीज निर्माण होऊन एक वर्ष झाले आहे.
हे मत्स्य केंद्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही मस्त्य विभागाला हस्तांतरित केले नाही. या केंद्राची दुरवस्था झाली आहे. आता या मत्स्य बीजनिर्मिती केंद्रातून एकही रुपयाचाही फायदा होत नसताना या केंद्राच्या दुरुस्तीचा नावावर कोट्यवधी रुपये खर्च करत शासनाच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. केंद्राची दुरवस्था झाली असल्याने जिल्हा मत्स्य विभागाच्या वतीने दुरुस्तीकरिता शासन दरबारी मागणी केली होती. शासनाने या मस्त्य बीज केंद्राचा फायदा व्हावा म्हणून वेगवेगळ्या कामांकरिता २० लाखांच्या चार निविदा काढल्या होत्या.
एकूण ८० लाख रुपयांचे काम या केंद्रात करण्यात आले. त्यात मत्स्य टाकी, नाली बांधकाम, ताराचे कुंपण, रस्ता असा एकूण ८० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. हे काम चारही वेगवेगळ्या संस्थांना देण्यात आले. यावर नियंत्रण म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली संपूर्ण बांधकाम सुरू होते. दरम्यान, या केंद्रात अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालं आहे.
या केंद्राकडे जाणारा रस्ता न वापरताही एका वर्षातच उखडला आहे. मत्स्य टाकी तुटून पडली आहे. विशेष म्हणजे अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने मत्स्य विभागाला हे केंद्र हस्तांतरित केलं नसल्याने प्रत्यक्षात ही कामेच निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. जरी दुरुस्ती कामे संस्थांनी केली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत निकृष्ट काम झालं आहे.
या कामाबाबत वाघमारे म्हणाले की, नियमानुसार काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्यास ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला दिली जात नाही. पण अधिकारी महोदयांनी ७५ टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली आहे. यात अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने संपूर्ण काम झालं आहे. त्यामुळे आता जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे.
आता ही सर्व कामे विद्यमान आमदार राजू कारमोरे यांच्या मतदारसंघातील असल्याने बीआरएस नेते, माजी आमदार चरण वाघमारे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारमोरे यांच्यात राजकीय वाद पेटणे साहजिक आहे. त्यामुळे आता राजू कारमोरे यांनी स्वतःहून या कामाच्या चौकशीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.