Modi's Yavatmal Tour : भावनाताई आपली कामेही सांगणार की केवळ ‘मोदी है तो मुमकीन है’चे गुण गाणार?

Bhavana Gawali : पाच वर्षातील विकास कामांचा द्यावा लागणार हिशोब
Bhavana Gawali & Narendra Modi.
Bhavana Gawali & Narendra Modi.Sarkarnama
Published on
Updated on

Modi's Yavatmal Tour : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून यवतमाळ कलंकित आहे. एकूणच विदर्भाच्या उपेक्षितपणात यवतमाळच्या शेतकरी आत्महत्यांची भरच घातली आहे. कोणताही उद्योग नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, उच्च शिक्षणाची सोय नाही आणि धड दळणवळणाची साधने नाहीत असेच काहीसे यवतमाळ जिल्ह्याबाबत बोलावे लागले. अशात लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे पुन्हा यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील मतदारांशी संवाद साधणार आहेत. यंदा मोदी साद घालणार आहेत ती नारीशक्तीला.

मोदींच्या या यवतमाळ दौऱ्यात खऱ्या अर्थाने कस लागणार आहे तो विद्यमान शिवसेना खासदार भावना गवळी यांचा. ‘जायंट किलर’ असे बिरूद नावामागे मिरविणाऱ्या भावना गवळी यांना मोदींच्या व्यासपीठावरून त्यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी नेमके काय काय केले याचा हिशोबच मतदारांपुढे मांडावा लागणार आहे. त्यामुळे नरेंद्रभाईंच्या दौऱ्यात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात कोणकोणती विकास कामे खेचून आणली याचा पाढा त्या वाचणार की केवळ ‘मोदी है तो मुमकीन है’चेच गीत गाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhavana Gawali & Narendra Modi.
Lok Sabha Election 2024 : मोदींच्या सुरक्षा ताफ्यासाठी येणार 700 इनोव्हा कार

कलम 370 हटविणे, उज्ज्वला गॅस योजना, गरीबांसाठी धान्य, आयुष्यमान भारत, कोविड काळातील कामे, शेतकरी कायदा, राम मंदिर, पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ ही कामे केंद्र सरकारची आहेत. समृद्धी महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्याई आहे. अशात भावना गवळी यांनी व्यक्तीश: कोणकोणती कामे यवतमाळ आणि वाशीम या दोन मागास जिल्ह्यांसाठी खेचून आणली हे त्यांना सांगावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना भावना गवळी यांच्यामागे ईडी आणि आयकर विभागाचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे त्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त टर्म मतदारसंघातून गायबच होत्या, असे विरोधक बोलतात.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेपर्यंत ‘त्या’ शिवसेनेसाठी भाजप, मोदी-शाह आणि फडणवीस हे हिटरल-मुसोलिनीच होते. भाजप-शिवसेनेच्या युतीत वितुष्ट निर्माण होईपर्यंत भावनाताई या नरेंद्रभाई यांना नियमितपणे राखी बांधायच्या. वितुष्ट निर्माण झाल्यानंतर मात्र ‘मातोश्री’ला हा प्रकार आवडणार नाही म्हणून त्यांनी सर्वांप्रती असलेल्या आपल्या बंधूप्रेमाला आवर घातली होती. ठाकरेंचे शिवबंधन तोडून गवळी त्यानंतर शिंदेसेनेत दाखल झाल्या. आता पुन्हा त्यांनी ‘भय्या मेरे राखी के बंधन को निभाना..’ म्हणणे सुरू केले आहे. अशात केवळ केंद्र सरकारने केलेल्या कामांच्या भरवश्यावर किती दिवस तरणार असा प्रश्न आता मतदार सर्वांनाच विचारू लागले आहेत. भावना गवळीही त्यातून सुटलेल्या नाहीत.

Bhavana Gawali & Narendra Modi.
Modi's Yavatmal Tour : चोऱ्या रोखू न शकणारे यवतमाळ पोलिस मोदींच्या सुरक्षेचे आव्हान पेलतील?

नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये यापूर्वी तीनदा येत शेतकरी, शेतमजूर, गरीबांशी संवाद साधला. परंतु त्यांचे शिलेदार मतदारसंघासाठी काहीच करू शकले नाही नव्हे तर त्यांनी प्रयत्नच केले नाहीत, असे आता मतदारांना वाटत आहे. त्यामुळे माजी खासदार हंसराज अहीर आणि खासदार भावना गवळी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अशात यवतमाळ-वाशीम जिल्ह्यात किती उद्योग आणले, किती प्रमाणात शेतकरी आत्महत्या थांबविल्या, किती शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारांना मदत केली, किती रेल्वे प्रकल्प पूर्ण झालेत, कोणत्याही राजकीय नेत्याचा संबंध नसलेल्या उच्च शिक्षणाच्या किती संस्था, सुविधा यवतमाळ-वाशीममध्ये आल्या, बचत गटाच्या किती महिला उद्योजक झाल्यात हे सारे भावना गवळी यांना सांगावे लागणार आहे.

Bhavana Gawali & Narendra Modi.
भावना गवळी बांधावर पोहोचल्या ; शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली| Bhavana Gawali |

भावना गवळी यांना हे सर्व मतदारांना सांगावे लागणार आहे. यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात केलेल्या सर्व विकास कामांचे ठोस पुरावे त्यांना दाखवावे लागणार आहे. आता केवळ मोदी आहेत म्हणून मतदारसंघात काहीही होऊ शकते, हे सांगून चालणार नाही, असा मतदारांचा सध्याचा मूड आहे. गवळी हे सगळे सांगू शकल्या तर ठिक अन्यथा मतदार जेव्हा ‘ऑडिट’ सुरू करतात तेव्हा त्यांच्या हिशोब मागण्याची पद्धत प्रसंगी ईडी, आयकरपेक्षाही भारी असते हे राजकारण्यांना चांगलेच ठाऊक असते.

Edited By : Prasannaa Jakate

Bhavana Gawali & Narendra Modi.
Lok Sabha Election 2024 : भावना गवळींच्या कार्यक्रमाकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पाठ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com