Modi's Yavatmal Tour : येत्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या दिशेने पोलिस आणि अन्य सुरक्षा संस्था प्रयत्नशील आहेत. असे असले तरी कुठल्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सुरक्षा ही स्थानिक पोलिसांवरच अवलंबून असते.
घरफोडी आणि चोऱ्या नियंत्रित न करू शकणारे स्थानिक पोलिस खरंच मोदींच्या सुरक्षेचे आव्हान पेलतील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नव्हेतर स्थानिक पोलिसांपेक्षा वरिष्ठ सुरक्षा संस्थांवरच मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी असेल, असेही आता बोलले जात आहे. कडेकोट सुरक्षा असलेल्या येथील औद्योगिक वसाहतीतील रेमंड कंपनीच्या रेमंड हाऊसिंग कॉलनीत चोरट्यांनी धुमाकूळ घालून इंजिनिअरिंग डिपार्टमेंट विभागप्रमुखाच्या बंगल्यातून जवळपास ९०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अभियंता संजीवकुमार पांडे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंट विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पांडे यांच्या मेहुणीच्या मुलाचे लग्न बिहारमधील पटना येथे होते. त्यामुळे ते कुटुंबासह बिहार येथे गेले होते. अशातच रेमंड हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. रेमंड कंपनीचे युनिट हेड नितीन श्रीवास्तव यांनी पांडे यांना फोनद्वारे त्यांच्या घराचे लॉक तुटलेले दिसत असल्याची माहिती दिली. या चोरीच्या घटनेत चोरांनी जवळपास 900 ग्रॅम सोने आणि 61 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात ७१५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ६१ हजार रोख असा एकूण २९ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रेमंड हाऊसिंग सोसायटीच्या भोवताल उंच अशी सुरक्षा भिंत असून, त्यावर तारेचे कुंपण आहे. मात्र, एका भिंतीजवळ मोठे झाड असल्याने त्या झाडाचा आधार घेऊन चोरट्यांनी हाऊसिंग सोसायटीत प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांकडून लावण्यात येत आहे. त्या दिशेनेदेखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांत यवतमाळ शहरात घरफोडी, जबरी चोरीसह गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मात्र, या घटना नियंत्रित करण्यात स्थानिक पोलिस अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटाच्या महिला मेळाव्याच्या निमित्ताने 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. येथील नागपूर मार्गावरील भारी शिवारात 26 एकर जागेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. सुमारे दीड लाख महिलांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
पंतप्रधान मोदी यांचा दौरा चार दिवसांवर असताना येथील औद्योगिक वसाहतीतील रेमंड कॉलनीत धाडसी घरफोडीची घटना घडली. त्यातही सुमारे एक किलो सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे घरफोडी आणि चोरीच्या घटना नियंत्रित करू न शकणारे स्थानिक पोलिस खरेच मोदींच्या सुरक्षेचे आव्हान पेलतील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.