Nagpur News : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने नागपूर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊ घातलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे.
या कार्यक्रमात माजी मंत्री सुनील केदारांचे समर्थक गोंधळ घालण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने भाजपच्यावतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या घोटाळ्यांची उजळणी सुरू केली आहे.
लोकार्पण होऊ घातलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत अद्याप कुठल्याही सुविधा नाहीत, कर्मचारी नसताना श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन केले जात असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यावर लोकार्पण कार्यक्रमासाठी दबाव टाकण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी राज्य शासनाच्या निधीतूनच आरोग्य केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र, जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या काँग्रेसला (Congress) ते सहन होत नाही.
अध्यक्षांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आहे. उलट राज्य शासनाने जनसुविधेसाठी दिलेल्या 45 कोटींच्या निधीवर कोर्टातून स्टे आणूण काँग्रेस नागरिकांना सुविधेपासून नागरिकांना वंचित ठेवत असल्याचा आरोप उमरे यांचा आहे. महायुती सरकारने 86 कोटी रुपये जिल्ह्याला पाणंद रस्त्यांसाठी दिले आहे.
आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी 99 कोटी दिले. आशा वर्कर व ग्राम सेवकांना टॅब वाटप केले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखू लागले आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसने सेस फंडाची रक्कम फिक्स डिपॉजिट म्हणून ठेवली आहे. ती आरोग्य आणि शिक्षणावर खर्च केली जात नाही.
ग्रामीण भागातील जनतेची अडवणूक ही केदारांच्या आदेशावरून केली जात असल्याचे भाजपच गटनेते व जिल्हा परिषदेतील विरोधीपक्ष नेते आतिष उमरे यांचे म्हणणे आहे. नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीला यापूर्वी 250 कोटी रुपये दिले जात होते. राज्यात भाजपची (Bjp) सत्ता आली तेव्हापासून डीपीसीचे बजेट 950 कोटींवर गेल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.