Pune News : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे पक्ष एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचं बोललं जात आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री कोण असणार? हा सध्या वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पुन्हा मुख्यमंत्री राहणार की देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच आता आघाडी आणि महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा वाद मिटला नाही तर, पुढचा मुख्यमंत्री मीच असेल असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, ही मागणी मी संसदेत केली आहे. याबाबतचं पत्र मी अमित शहांना दिलं आहे. महात्मा जोतिबा फुले आणि आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, अशी आमची मागणी आहे. या दोन्ही महापुरुषांचे मोठे योगदान आहे. यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून राज्य सरकारच्या वतीने ही मागणी केली पाहिजे. राज्य सरकारची शिफारस आल्यानंतरच भारतरत्न संदर्भात विचार होत असतो. त्यामुळे राज्य सरकारने शिफारस करावी." भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्रामधून नितीन गडकरी यांचा नंबर लागला होता.
महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा (BJP) बालेकिल्ला आहे. त्यामुळे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीस होऊ शकतात याबाबतची शक्यता नाकारता येत नाही. फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्ये असणारच आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वादावरती बोलताना रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणतात, 'एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील' माझी दोघांनाही विनंती आहे की त्या दोघांनी राजकारणामध्ये रहावं. ते दोघेही माझे चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं नाही तर शिंदे स्वतः नाराज होते.
उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेस शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवला असता तर ते कदाचित बाहेर आले नसते, असा दावा आठवले यांनी केला. तसंच, एकनाथ शिंदे हे स्वतः आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोडलं ही जी चिड उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे. ती त्यांनी काढून टाकावी असं आवाहनही त्यांनी ठाकरेंना केलं. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यास महायुतीकडून मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
तसंच निवडणुकांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकील वाद विकोपाला पोहोचला आहे. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले जर मुख्यमंत्रीपदाचा वाद मिटत नसेल तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असेन, असं भाकीत रामदास आठवले यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.